हे टिपूर चांदणे...

हे टिपूर चांदणे, चंद्रही हवा हवा

प्रीतिचा तुझ्या मला लाभु देत गारवा.



रोग प्रीतिचा असा लागला मला-तुला

व्यर्थ जाहली दवा, व्यर्थ जाहली दुवा.



ओठ कापरे तुझे जाळती मला असे

स्पर्श स्पर्श हा तुझा वेड लावितो जिवा.



मोकळ्या तुझ्या बटा आसमंत हे जसे

वेचु देत तारका चेतवून जाणिवा.



शब्द शब्द आठवू, ओठ ओठ रंगवू

चाखु या पुन्हा पुन्हा ही मिठास गोडवा.



जीव गुंतला असा, श्वास कोंडला अता

या तुझ्या मिठीमधे श्वास घेउ दे नवा.



मैफलीत प्रीतिच्या रात्र रात्र गाउनी

मालवून टाकु या अंतरातला दिवा.





------------------ शतानंद.