फुकटची कमाल डील्सची धमाल!

इकडे परदेशात आल्यानंतर मी सेल, डील्स्, ना नफा ना तोटा किमती (थ्रो अवे प्राईजेस?) या सगळ्यांना चांगलीच रुळले आहे. तसे पुण्यात असताना सेल ही संकल्पना नवीन नव्हती पण दिवाळी, दसरा आणि सेल हे समीकरण डोक्यात फिट बसले होते. कार बरोबर मोबाईल फुकट, फ्रीजबरोबर घड्याळ फुकट, टीव्हीबरोबर डीव्हीडी फुकट असा सपाटाच दुकानदारांनी लावलेला असायचा आणि त्याचे अप्रूपही वाटायचे पण इंग्लंडमध्ये आल्यावर उठसूठ रोज सवलती, जेवणाच्या वेगवेगळ्या डील्स, एकावर एक फुकट हे रोज बघून नवलाई कमी होत गेली आणि हळूहळू तेच अंगवळणी पडायला लागलं. अजूनही दुकानात गेलं की कुठे सवलती, कमी किमती आहेत का यासाठी डोळे भिरभिरायला लागतात.

घरी आठवड्यातून कमीत कमी २-३ वेळा तरी चकचकीत, गुळगुळीत आणि आकर्षक रंगसंगती असलेली माहितीपत्रके कुठे स्टॉक क्लिअरन्स (मराठी प्रतिशब्द?), बर्गर मिल डील, दोन पिझ्झा घेतल्यास कोक फुकट, तर कुठे इंट्रोडक्शन किमती (म.प्र.?) अशा डील्सने खच्चून भरलेली असतात.

या सगळ्यात आपली भारतीय दुकाने ही मागे नाहीत बरं का! नुकतीच दिवाळी खरेदी करण्यासाठी एका दुकानात गेलो असता पोह्याच्या एका पाकिटावर अजून एक पाकीट फुकट, ६ पराठ्यांबरोबर डाळ फ्राय फुकट असा मामला दिसला.

इथल्या हवामानाप्रमाणे कपड्यांची फॅशन ही बदलते. त्यामुळे मार्च महिना सुरू झाला की हिवाळी कपड्यांचा कमी किमतीत सेल लागतो . नाताळ संपला की जानेवारीत थ्रोअवे किंमतींचे सेल चालू होतात आणि आमच्यासारखे मध्यमवर्गीय याचीच वाट पाहत असतात.

इथे शनिवार-रविवार खरेदीची जत्राच असते. आपण जसे फक्त सणाला किंवा वाढदिवसाला नवीन कपडे घेतो (आता आपल्याकडेही असे राहिले नाही म्हणा) तशी पद्धत इथे नाही. नवीन दुकान उघडले की इंट्रोडक्शन किमतींचा सेल चालू होतो, कधी मिड सीझन सेल असतो तर कधी दुकान बंद होतेय म्हणून सेल असतो अशाप्रकारे खरेदीचा सिलसिला वर्षभर चालूच असतो.

या सगळ्यातून सिनेमागृहे पण सुटलेली नाहीत. संध्याकाळी ६ च्या आधी चित्रपटाला गेलात तर तिकिटात थोडी सवलत असते आणि जर तुम्ही तिथले सदस्य असाल (वर्षभराचा करार करून दर महिन्याला ठराविक रक्कम भरली की तुम्ही तिथले सदस्य होता आणि अमर्यादित चित्रपट पाहू शकता.... अरेच्चा!! ही पण एक डीलच की!!) तर अशा सदस्य लोकांना दोन मोठे पॉपकॉर्न चे डबे घेतले तर पेप्सी फुकट मिळते.


माझ्या लहानपणचा काळ मला आठवला की दर महिन्याची वाणसामानाची यादी आठवते. कारण ती यादी लिहिण्याचे काम माझ्याकडेच असायचे. अर्धा कि. ह. डा., मु. डा, तु.डा., उ. डा., पोहे, साबण, तेल, गूळ, दाणे, भांडी घासायचा साबण अश्या नाना वस्तूंची यादी तयार व्हायची. साधारण खर्चाचा अंदाज आला की एखाददोन वस्तू कटाप व्हायच्या. मग वाणी घरी येऊन सगळं सामान त्याच्या कळकट झालेल्या ताडपत्री पिशव्यांतून पोचतं करायचा. त्यात १००० रू. ची खरेदी केली तरच घरपोच सेवा फुकट असा काही नियम नव्हता जसा इथे आहे.(५० पौऊंडाच्यावर खरेदी केली तर घरपोच सेवा फुकट!)

तसे आईच्या भाजीवाला, बोहारीण, भांडेवाली या सगळ्यांशी काही ना काही घरगुती डील्स चालूच असायच्या.
३-४ महिन्यापूर्वी भारतात गेले असताना एका ब्यूटीपार्लरला भेट दिली. तर बाहेर पाटी होती अमके अमके फेशियल केल्यास भुवई कोरणे फुकट, चेहऱ्याला लावायच्या लेपावर वर एक क्रीम फुकट..
तसे लहानपणीपासून पाणीपुरीवाल्याकडची एक डील मनोमन ठरलेली असायची एक बशी पाणीपुरी खाल्ल्यावर एक नुसती कोरडी पुरी फुकट!


एकूण काय हे देशापरदेशातील फुकटचं प्रकरण इतकं सवयीचं झालंय की त्याशिवाय चैनच पडत नाही. काहीतरी फुकट घेऊन आलो हे मनाला समाधान असतं पण कोठेतरी खरंच असे फुकटचे कोणी देतं का? हा पण विचार चालू असतो. तुम्हाला काय वाटतं?