मराठी भाषेची शुद्धाशुद्धता काही मुद्दे

तात्यांच्या चर्चेत  काही लक्षात आलेले काही मुद्दे सविस्तर विचार  दृष्टीने  ससंदर्भ मांडत आहोत.


अ) संदर्भ : मराठी लेखन-कोश -कोशकार अरुण फडके; पान ४४


"परंतु या कोशात दाखवलेले शब्द व त्यांची रूपे यांचे संपूर्ण नियमन करण्यास महामंडळाचे हे अठरा नियम अपुरे पडतात.त्यांमुळे नियमांच्या कक्षेबाहेरील शब्द व त्यांची रूपे यांकरिता विचारात घ्याव्या लागलेल्या बाबी पुढील प्रमाणे:-


१) रेफार(रफारापूर्वीचे) इकार व उकार.


२) 'इक,य,त्य' हे प्रत्यय लागून तयार होणारे काही साधीत शब्द


३) अ-कारान्त,आ-कारान्त,ई-कारान्त,ऊ-कारान्त,ए-कारान्त,ऐ-कारान्त आणि ओ-कारान्त अशा पुल्लिंगी,स्त्रिलिंगी,नपुसकलिंगी नामांचे एकवचनाचे सामान्यरूप, अनेकवचन आणि अनेकवचनाचे सामान्यरूप करण्याची सर्वसाधारण पद्धत,यांतील उदाहरणात्मक अपवाद.


४) तृतीयेचा 'ए',पंचमीचा 'ऊन', आणि सप्तमीची 'ई' हे विभक्तिप्रत्यय काही अ-कारान्त,आ-कारान्त नामांना लावणे.


५) काही अ-कारान्त नामांची  - वीशेषतः ग्रामनामांची - आणि स्वीकृत इंग्लीश शब्दांची - एकवचनी सामान्यरूपे.


६) दीर्घान्त मराठी शब्दांचे उभयवचनी सामान्यरूप व अनेकवचन.


७) य-कारान्त मराठी शब्दांचे उभयवचनी सामान्यरूप व अनेकवचन.


८) अभ्यस्त शब्द आणि जोडशब्द अशा नामांचे उभयवचनी सामान्यरूप आणि अनेकवचन


९) अभ्यस्त शब्द आणि जोडशब्द अशा विशेषणांचे सामान्यरूप आणि त्यांची विशेष्यानुसार बदलणारी रूपे.


१०) विशेषणांची सामान्यरूपे आणि विशेष्यानुसार बदलणारी रूपे.


११) 'ईय'(कुटुंबीय,परकीय) असा शेवट असलेल्या शब्दांचे उभयवचनी सामान्यरूप आणि अनेकवचन


१२) सर्वनामांची विभक्तिरूपे


 ब)  संदर्भ : मराठी लेखन-कोश -कोशकार अरुण फडके; पान १९


शुद्धलेखन आणि आजची परिस्थिती: शिक्षण लेखन आणि मुद्रितशोधन या तीन घटकांचा शुद्धलेखनविषयक परिस्थितीचे बरे वाईट करण्यात मोठा वाटा असतो..., महामंडळाच्या शुद्धलेखन नियमांपैकी मर्यादित नियमच शाळा व महाविद्यालयस्तरावर शिकवले जातात...,मुळात महामंडळाचे हे १८ नियम अपुरे पडतात,त्यात पुन्हा जे आहेत ते सगळे शैक्षणीक आयुष्यात कधी शिकवले जात नाहीत. अशा परिस्थितीत समाजाक्डून शुद्धलेखनाची अपेक्षा करणेच चुकीचे आहे..̮ लेखन आणि मुद्रितशोधन या दोन बाबींचा विचार एकत्रित पणे करता येईल..̮ लेखक व मुद्रितशोधक दोघेही गेल्या विसेकवर्षात शिक्षण घेतलेले असतील तर यादोघांचे शुद्धलेखन चांगले नसण्याचीच शक्यता जास्त असते... या परिस्थितीत 'दोष ना कुणाचा' हे मान्य केले तरी 'पराधीन' मात्र आत्ताची आणि येणारी पिढी आहे.


क) 'मराठीचे व्याकरण' -डॉ. लीला गोविलकर


*मराठी भाषा ही इंग्रजी-संस्कृत पेक्षा वेगळी भाषा आहे‌. संस्कृत-इंग्रजी व्याकरणांचा प्रभाव मराठी भाषेच्या व्याकरणाचे वेगळे व्यक्तिमत्व दाबून टाकू पहातो.


*...व्याकरणाने  भाषेतील एकाचरूपाला मान्यता देणे  म्हणजे भाषेच्या विविधतेला,तीच्या स्वाभाविक विकासाला अडथळा करण्या सारखे आहे....त्यामुळे  धड ना  आदेशात्मक, धड ना वर्णनात्मक अशी मधली-मधली स्थिती या व्याकरणांची झाली आहे व त्या मधूनच शुद्धाशुद्धबद्दल मते मांडली गेली आहेत.


शुद्ध व अशुद्ध हे शब्द या गोंधळात भर घालणारे आहेत....प्रत्येक भाषेमध्ये नियम तयार होत असतात...पाळले जात असतात...वाहने रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवावीत की ऊजव्या यांच्या संबधीच्या नियमांसारखे आपणच ठरवलेले असतात... 'ने' हा शुद्ध 'णे' हा प्रत्यय वाईट असे नसून त्याचा प्रसार किती व कोणत्या समाजा मध्ये या गोष्टी लक्षात घेतलेल्या असतात... शुद्धाशुद्धाचा विचार करताना डॉ̱. ग्रामोपाध्ये म्हणतात,की भारतामध्ये व्याकरणशास्त्राची सुरुवात झाली, ती अपभ्रष्ट शब्दांपासून संस्कृत शब्द वेगळे ठेवण्याच्या कल्पने मधून;म्हणजे शुद्धाशुद्धाच्या दृष्टीकोनातून होय..(पान३४)[ ह्या ग्रंथातील उहापोह अत्यंत सविस्तर आणि अत्यंत वाचनीय आहे मराठी व्याकरण विषयाची  गोडी असलेल्या व्यक्तिंनी वाचावाच असा ग्रंथ आहे ]


*मराठीतील शुद्धलेखनाचा भर 'इ' आणि 'उ' ह्यांच्या ऱ्हस्व दीर्घ लेखनावरच अधिक आहे,हे शुद्धलेखनाचे नियम पाहता स्पष्ट होते... व्यावहारिक पातळीवर अडचण म्हणजे जर लेखनातून हि (दीर्घ ई दीर्घ ऊ)  ही चिन्हे घालवून टाकली,तर  वीहीर किंवा विहिर ,नदि,मि,तु असे पाहण्याची सवय करावी लागेल.ती सवय करण्यापेक्षा ही चिन्हे कायम ठेवावीत .पण त्यासाठी त्यांना वर्ण म्हणण्याचा आग्रह मात्र शास्त्रपूत नव्हे.[कृपया ही चर्चा खुपच प्रदीर्घ आहे ,वेळ आणि जागेच्या अभावी संपूर्ण देणे शक्य नाही पण वाचनीय आणि चिंतनीय आहे.]


ड) मराठी भाषेचा इतिहास डॉ. ग. ना. जोगळेकर  (पान १८८)


...पेशवे कालापर्यंत आणि नंतरही मराठीचे गद्यलेखन मोडी लिपीत करण्याचा प्रघात होता.मोडी लिपीत विराम चिन्हांचा वापर करण्याची पद्धतच नव्हती....'ई'काराचे लेखन दीर्घ करायचे आणि 'उ'काराचे लेखन ऱ्हस्व करायचे असा संकेत होता....मुद्र्ण सुरू झाल्या पासून पहिल्या वीस-पंचवीस वर्षांमध्ये लेखकांनी बरेच स्वातंत्र्य घेतलेले दिसते.पण १८४७ मध्ये मेजर कँडी हा ब्रिटीश अधिकारी शिक्षण खात्याचा प्रमुख बनल्या पासून सर्वच चित्र पालटले..‌ सर्व अधिकार मेजर कँडी कडेच असल्यामुळे तो सांगेल त्या प्रमाणे लेखकांना आपल्या पुस्तकात लेखनाच्या व व्याकरणाच्या दुरुस्त्या कराव्या लागत ,ज्यांना हे मान्य नव्हते त्यांची पुस्तके मंजुर होत नसत.त्यामुळे कित्येक लेखकांनी आपल्या मनाविरुद्ध मेजर कँडीचे आदेश निमूटपणे  पाळले असे दिसून येते.... मेजर कँडीने १८४७ ते १८७७ असे तीस वर्षे काम केले.... शुद्धलेखन आणि व्याकरण विषयक सर्वच बाबतीत तो दक्ष असे .त्याने निर्माण केलेली नियमब्द्धता शालेय पाठ्यपुस्तकातून अंमलात आल्यामुळे नव्याने शिकणाऱ्या प्रत्येकावर मेजर कँडीकृत नियमंचाच पगडा बसू लागला.... एखादी व्यक्ती  अधिकारपदाच्या जोरावर भाषेला कसे वळण देऊ शकते याचे मेजर कँडी हे एक उत्तम उदाहरण होय. ... मराठीच्या व्याकरणाची  व लेखनाची भाषा निश्चित करताना मेजर कँडीने पुणे प्रांतात बोलली जाणारी मराठी हीच प्रमाण मानली होती.... तरी मराठी भाषेने त्याचे म्हणने काही प्रमाणात स्वीकारले काही प्रमाणात नाकारले.... बरोबर काय चुक काय  हे ठरवताना त्याने हडेलहप्पी केली असे म्हणणे अन्यायाचे ठरेल.


ई) भाषाशुद्धी चळवळ -(मराठी भाषेचा इतिहास डॉ. ग. ना. जोगळेकर वरून)


#कृपया मुळ संदर्भग्रंथ प्रमाण मानावेत. चुकभुल देणेघेणे. येथिल चर्चेचा विकिपीडियावर उपयोग केला जाईल.(मुळ लेखनात शक्यतो बदल होऊ नयेत म्हणून शुद्धि-चिकित्सा अपूर्ण - तसदी बद्दल क्षमस्व)


 शेवटी श्री. अरुण फडके म्हणतात ते खरे वाटते. "शुद्धलेखन हा अग्रह न राहता सवय झाली पाहिजे."


-विकिकर


ता.क. (तात्यांनी विकिपीडिया बद्दलचा रोष सोडावा हि विनंती)