साहित्य संरक्षण व प्रताधिकार कायदा

रावसाहेबांनी जीएंची माणूस नावाचा बेटा ही दीर्घकथा येथे आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून दिली. त्यांच्या चिकाटीचे आणि कष्टांचे कौतुक करावे तेवढे थोडेच.


आपल्या आवडत्या लेखकांच्या कथा इथे टंकित करणे या उपक्रमात भाग घ्यायला मलाही जरुर आवडेल. मात्र माझ्या काही (कु)शंका आहेत.


शंका १:


"हिरवे रावे" पुस्तकातील कथा येथे जशीच्या तशी छापली तर  copyright कायद्याचा भंग होत नाही का? रावसाहेबांप्रमाणे मलादेखील जीए, मिलिंद बोकील यांच्या काही कथा, अनिल अवचट यांचे लेख येथे उपलब्ध करावेत असे वाटत आहे. असे केले तर मनोगत व मनोगत प्रशासकांना कायदेशीर त्रास होईल काय?


शंका २:


मनोगतवर प्रसिद्ध होणाऱ्या स्वतंत्र साहित्यावर कोणाचा हक्क असतो? मनोगत प्रशासकांचा की त्या लेखकाचा?


रावसाहेबांना दिलेल्या एका प्रतिसादात मी खालील अनुभव दिला आहे.


हिटलरने त्याच्या राजवटीत केलेल्या अत्याचारांवर व यातनातळांवर आधारित एका सचित्र कादंबरीचा जीएंनी "वैऱ्याची एक रात्र" (किंवा - एक रात्र वैऱ्याची) या नावाने अतिशय सुंदर अनुवाद केला होता. ते पुस्तक विश्वमोहिनी प्रकाशन(??) यांनी प्रसिद्ध केले आहे. माझ्याकडे त्याची अतिशय जुनी प्रत होती. पुस्तकातील १०-१२ पाने गायब होती.


शब्द-न-शब्द तोलून मापून वापरणाऱ्या जीएंच्या पुस्तकातील १०-१२ पाने नसणे हा मोठाच तोटा. म्हणून पुण्यातील बहुतेक दुकानांत मी या पुस्तकाच्या दुसऱ्या प्रतीसाठी चौकशी केली तर हे पुस्तक सध्या छापत नाहीत असे कळले. विश्वमोहिनी प्रकाशनाचा सध्याचा पत्ताही कुठे मिळाला नाही.


 


जीएंच्या पुस्तकांचा खप आणि वाचकवर्गाची संख्या लक्षात घेता* काही दिवसांनी त्यांची सगळीच पुस्तके अशी out-of-print होतील अशी भीती वाटते. त्यामुळे copyright/royalty यांचा विचार करून देखील हे सगळे साहित्य digital स्वरूपात कुठे तरी साठवून ठेवले पाहिजे असे मनापासून वाटते**.


याविषयी काय करता येईल.


आपली मते जाणून घ्यायला आवडेल. 


(जी.ए. भक्त) छू  


* रावसाहेबांनी टंकित केलेल्या कथेला आलेल्या प्रतिसादांची संख्या आणि त्यांनी व्यक्त केलेली व्यथा याविषयीची काळजी अधोरेखित करते


** मराठी वाचणारे जर कोणी भविष्यात "शिल्लक" असलेच तर त्यांच्यासाठी