माझी आजी

माझी आजी म्हणजे आईची आई ! गोरापान रंग, निळसर घारे डोळे, उंच, उत्तम तब्येत आणि एकदम हाडाची कोकणस्थ! केलन्, खाल्लन् या तिच्या शब्दांची लहानपणी खूप मजा वाटायची..

तिचे माहेर राजापूर... मला सारखी म्हणते तुला राजापूरची गंगा दाखवायला नेईन एकदा पण अजून काही योग आला नाही.

सध्या ती डोंबिवलीत राहते. आईचे फारसे माहेरी जाणे होत नसल्याने तिची आणि माझी भेट एखाद्या सुट्टीतच व्हायची. पण ती जेव्हा डोंबिवली सोडून हवापालटासाठी पुण्यात आली तेव्हा खऱ्या अर्थाने आमचे सूर जुळले. आमच्या घरापासून ३-४ घरे लांब अशी एक जागा भाड्याने घेतली आणि आजी आजोबा दोघांचा संसार परत एकदा नव्याने सुरू झाला.
मी कामावरून आल्यानंतर रोज आजीच्या घरी जायचे. खूप गप्पा व्हायच्या. तिला वाचनाची खूप आवड. पेपर तर आवडीने वाचतच असे पण एका वाचनालयाची पण सभासद ती तेवढ्यात होऊन गेली. मग काय कधी संध्याकाळी पुस्तक बदलायला जा, कधी भेळ, पाणीपुरी, कच्छी दाबेली (तिला या सगळ्या चौपाटी डिश पण फार आवडायच्या), कधी कोणते प्रदर्शन, नाहीतर नुसतेच फिरणे! नुकत्याच वाचलेल्या पुस्तकावर किंवा लेखावर बोलायचो, छान वेळ जायचा. अजूनही आम्ही दोघी या दिवसांची आठवण काढत बसतो.
ती डोंबिवलीवरून येताना तिथल्या काही चांगले लेख असलेल्या पुरवण्या, कात्रणे मला वाचण्यासाठी घेऊन येत असे (सगळ्या चांगल्या वाचायच्या गोष्टी ठेवायची तिची जागा म्हणजे गादीखाली! ) आणि सोबत खास आम्हा दोघींचा आवडता खाऊ- कधी बुंदीचे कडक लाडू, कचोरी, मिनी बाकरवडी, डाळमोठ

असे विविध प्रकार असायचे.
माझे आजोबा फारसे बोलत नसत आणि अजूनही नाही. त्यांच्या जेवणाच्या, नाश्त्याच्या वेळा तिने गेली कित्येक वर्ष सांभाळल्या आहेत. जरा चुकून ५ मि. इकडेतिकडे झाली की त्यांच्या स्वयंपाकघरापाशी अस्वस्थ फेऱ्या सुरू होत. त्यांचे सगळेच तंत्र सांभाळणे हे तिच करू जाणे! तसे पूर्वी ते कडक होते. आजी म्हणते 'तुम्ही आताच्या मुली असे काही सहन करूच शकणार नाही' तसे आजच्या मुलींविषयी तिला खूप कौतुकही वाटते. नोकरी, घर, मुले सांभाळतात. चांगल्या शिकतात. अन्याय झाला तर सहन नाही करत बसत. नव्या पिढीच्या कोणत्याही गोष्टीला तिने नावे ठेवलेली मी ऐकलेली नाही. हा फरक असायचाच हे तिचे म्हणणे!

तिने कधीही पर्स वापरलेली नाही. तिचे पैसे कायम हातरुमालात असतात. रुमालाच्या एका बाजूला नोटा आणि एका नाणी ठेवलेल्या बाजूची अशी काही गाठ असते की ती मला अजूनही जमलेली नाही. तो रुमाल आणि एक कापडी पिशवी घेतली की चालली आजी बाहेर!
क्रोशाचे विणकाम तिनेच मला शिकवले. लहान मुलांचा स्वेटर, फोनवरचा रुमाल मस्त विणायची. 

तिच्या हाताला अप्रतिम चव! साधी फोडणीची पोळी केली तरी इतकी चविष्ट लागायची.  तिच्या हातची कढी, भेंडीची भरपूर तेलावर परतलेली पीठ पेरलेली भाजी हे माझ्या खास आवडीचे!

ती निरंकारी असल्यामुळे मूर्तीपूजा मानत नाही. तिचा देवापेक्षा माणसांवर जास्त विश्वास आहे. माणसातच देव असतो असे तिचे मानणे! तिला माणुसकीचे प्रत्यय अनेकदा आलेले आहेत.

येणाऱ्या अडचणींवर मात कशी करायची हे बहुतेक मी तिच्याकडूनच शिकले आहे. माझ्या माहेरची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने माझ्या लग्नाचा खर्च कसा काय होणार याची मला खूप काळजी वाटायची. मग आजी म्हणायची 'होतं सगळं व्यवस्थित, त्या वेळी बरोबर आपली माणसं मदतीला येतील बघ.' आणि तसेच झाले काका आणि आत्याच्या सहकार्यानेच माझे लग्न पार पडले. तिने एकच शिकवले कोणत्याही परिस्थितीत धीर सोडायचा नाही आणि प्रचंड इच्छाशक्ती हवी की काही अवघड नाही.
आताही माझ्या या 'हवे नको' दिवसांमध्ये बाकी सगळ्यांना वाटते मी भारतात असावे ही एकटी घरातली कामे कशी करेल? जेवण कसे बनवेल? काही त्रास झाला तर? अशी चिंता घरच्यांना वाटत आहे. पण 'काही नाही होतं सगळं व्यवस्थित एकटी असली म्हणून काय झालं? सावकाश कामे करत जा. अगं, मजूर आणि कामगार बायका बघतेस ना कशी कामं करतात ते? आपल्यालाच कोडकौतुक करून घ्यायची फार सवय असते. काही नाही धीटपणाने राहा, माझा विश्वास आहे तुझ्यावर' असे सांगणारी एकमेव आजीच!

ती कविताही छान करते. प्रसंगानुरुप सगळ्या कविता आहेत तिच्याकडे.
मला प्रचंड अभिमान आहे की तिच्यासारखी आजी मला मिळाली. देव करो आणि पुन्हा लवकरात लवकर तिची आणि माझी भेट घडो!

अंजू