निखारे

जाऊ दे एकदा होऊन सारे
टाक तू बोलून उरी बोचणारे


बोलू दे बोलायचे जे त्यांना
चावते ना कुत्रे कधी भुंकणारे


वादळी आयुष्य हे गेले माझे
होते कधी माझ्यासाठी किनारे


शीड सांभाळून ठेवा आता तुम्ही
हे उद्याचे आलेत बेबंद वारे


कोणत्या बाजूस जावे गलबताने
विसरले आहेत हे दिशा तारे


प्राण जाताना वळून पाहिले मागे
दोस्त माझेच होते मला मारणारे


शांत ही दिसते जरी चीता माझी
पेटते आहेत आतून हे निखारे


              - अनिरुद्ध अभ्यंकर