व्यथा

मन मोठे चंचल बेटे सांगून नाही ऐकत
नकोस गुंतू कुठेही म्हटले तरी नाहीच त्याला पटत ॥


कळत नकळत लाखो वेळा घ्यायचे शहाणपण विकत
आयुष्य घालवायचे का हरघडी नवे नवे शिकत ॥


मागून येऊन पुढे कोणी जातात, स्व-चालीने चालत
निर्बंध मात्र जुने नवे राहायचे आपणच का पाळत?


कोणासाठी कोणी नाहीच कधी थांबत
आपण मात्र साऱ्यांसाठी राहायचे असते चालत ॥


मार्ग असतो पळत आणि जीवनाला वळवत
आयुष्य कसे घालवायचे मार्गावरून अडखळत?


कथा या सुख दु:खाच्या नाहीच कधी सरत
क्षण मात्र दुर्मिळसे कधीच येत नाहीत परत ॥


सांगायचे कोणाला काय नाहीच काही कळत
कोणीच नाही आपले हेच बसायचे आळवत ॥


आपण एकटे जीव एकटा नि मनही एकटे असते
ऐकायला वेडे मनोगत कुणीच उरलेले नसते ॥


- संगीता कुलकर्णी