मेजर मनीष हिराजी पितांबरे






गड आला, पण सिंह गेला

[म. टा. Thursday, November 30, 2006 12:44:59 am]




/photo.cms?msid=644259

प्रवीण मुळ्ये , ठाणे

काश्मीरात धारातीर्थी पडलेल्या मेजर मनीष पितांबरे यांना शेवटची सलामी देण्यासाठी आलेल्या त्यांच्या रेजिमेण्टच्या सैनिकांना अश्रू आवरणं अवघड जात होतं. सैनिक ढसाढसा रडताना पाहून सर्वच उपस्थितांच्या अश्रूंचा बांध फुटला. देशाच्या या निधड्या सैनिकाला निरोप देण्यासाठी अवघं ठाणे शहर रस्त्यावर उतरलं होतं.

*****************************

श्रीनगर जवळ असलेल्या बीजबेहार गावात हिज्बुलचे काही अतिरेकी लपल्याची पक्की खबर होती. त्यात काश्मिरमधल्या अतिरेकी कारवायांचा मास्टरमाइण्ड असलेला फैजल हा खतरनाक अतिरेकीही होता. मेजर मनीष पितांबरेच्या नेतृत्वाखाली पॅरा रेजिमेण्टच्या जवानांनी रात्री ऑपरेशन सुरू केलं. गावातल्या एका घरावर लष्कराच्या जवानांच्या बंदुकींच्या दस्त्यांची थाप पडली आणि क्षणार्धात सारा परिसर बंदुकीच्या गोळ्यांच्या आवाजांनी थरारला.

घरातल्याच अतिरेक्यांनी लष्करावर थेट हल्ला चढवला होता. सावध पॅरा रेजिमेण्टनेही प्रत्त्युतर दिलं. गेल्या चार महिन्यांपेक्षाही अधिक काळ पोलिस शोध घेत असलेला फैजलही त्यात होता. मेजर मनीष आणि फैजल यांचा आमनासामना झाला. मेजर पितांबरे यांनी फैजला कंठस्नान घातलं. पण एका गोळीने मेजर मनीष यांचा घात केला. एका शौर्यगाथेचा अंत झाला होता. पण तोपर्यंत ऑपरेशन फत्ते झालं होतं. अमरनाथ यात्रेकरूंवर झालेला हल्ला , काश्मिरमधले कार बॉम्बस्फोट आणि अतिरेक्यांना मिळणारी आथिर्क मदत पुरवण्याच्या संदर्भात दोषी असलेल्या फैजलचा खेळ संपला होता. पण त्यासाठी भारतीय सैन्यातला एक निधडा अधिकारी कामी आला. मेजर मनीष यांना शेवटची सलामी देण्यासाठी आलेल्या त्यांच्या रेजिमेण्टच्या सैनिकांना अश्रू आवरणं अवघड जात होतं. सैनिक ढसाढसा रडताना पाहून सर्वच उपस्थितांच्या अश्रूंचा बांध फुटला. मेजर मनीषला निरोप देण्यासाठी अवघं ठाणे शहर रस्त्यावर उतरलं होतं.

लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रात्री साडेबारा वाजता मेजर मनीष यांची अंत्ययात्रा ठाण्यातून निघाली. त्यांची एक वर्षाची मुलगी युक्ता हिने , बाबा लवकर या , म्हणत त्यांना निरोप दिला आणि सारा परिसरच सद्गदित झाला. त्यांना निरोप द्यायला तरुण वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता. कोणी मेजरच्या बालपणीच्या आठवणीत रमले होते तर कोणी त्यांच्या कुटंुबियांना आधार देत होतं. कर्तव्य बजावताना धारातिथीर् पडलेल्या मेजर मनीषची शौर्यगाथा प्रत्येकाच्या ओठी होती.

मेजर मनीषचे अनेक बालपणीचे मित्रही ही बातमी कळताच त्यांच्या निवासस्थानी येत होते. ' धाडस तर त्याच्या रक्तातच होतं ', ' लष्करात अधिकारी बनून आपल्या वडलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मनीषने घेतलेली मेहनत आम्ही पाहिली आहे ', ' मित्रांमध्ये तर मनीष लाडका होताच पण कोणाच्याही अडचणीत धावून जाण्याच्या त्याच्या स्वभावामुळे त्याच्याविषयी आम्हा मित्रांमध्ये आदरही होता '... मनीषचे बालपणीपासूनचे मित्र वैभव काळे , राजेश सरवदे सांगत होते. देशासाठी मनिषने स्वत:चा देह ठेवला. आता त्याच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहाण्याचा निर्धारही मित्रंमडळींनी केला आहे.

मला सैन्यातच जायचं आहे

१९८७ मधली ही गोष्ट. ठाण्याच्या महाराष्ट्र विद्यालयात जोग मॅडम समाजशास्त्राचा वर्ग सुरू होता. त्या लष्करात करिअरविषयीची माहिती मुलांना देत होत्या. लेक्चर संपल्यानंतर एक विद्याथीर् मॅडमजवळ आला आणि म्हणाला मला सैन्यातच जायचं आहे. वाट्टेल ती मेहनत करण्याची माझी तयारी आहे. त्या मुलाने आपला शब्द पाळला. दहावीला ८४ टक्के मिळूनही मेडिकल किंवा इंजिनियरिंगची निवड न करता त्याने सैन्यात भरती होण्यासाठीच्या परीक्षांवर लक्ष केंदित केलं. जिद्द व मेहनतीच्या जोरावर लष्करात मेजर बनलेल्या त्या मुलाचं नाव होते मनीष हिराजी पितांबरे. या धाडसी विद्यार्थ्याच्या शौर्याचा महाराष्ट्र विद्यालयातल्या प्रत्येकाला सार्थ अभिमान आहे. पण त्याचवेळी त्याच्या मृत्यूचा सलही आहेच. अधिकधिक मराठी मुलांनी सैन्यात यावं , म्हणून तो स्वत: प्रयत्नशील होता. यासाठी त्याने अनेक लेक्चर्सही घेतली होती. त्याचं हे बलिदान आम्ही व्यर्थ जावू देणार नाही , असा निर्धार शाळेने केला आहे.

देव्हाऱ्यात स्थान

मेजर मनीष पिंताबरे आणि मेजर नीलेश पाथरकर हे दोघे आग्रा इथे एकत्र होते. मनीषच्या निधनाने पाथरकर कुटुंबांवरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे. काही महिन्यांपूवीर्च अतिरेक्यांशी लढताना मेजर निलेशचे एक मित्र मेजर ओंकार शहीद झाले होते. त्यानंतर त्यांचा फोटो मेजर नीलेशचा मुलगा अभिमन्यू देव्हाऱ्यात ठेवला होता. मनीष तर अभिमन्यूच्या खूप जवळचे होते. आता त्यांच्यासाठीही अभिमन्यूने देव्हाऱ्यात जागा केली आहे. मेजर नीलेशच्या आई वृंदा पाथरकर यांना दु:ख आवरणं अवघड जात होतं. नीलेश आणि मनीष हे एकमेकांचे जवळचे मित्र. काही दिवसांपूवीर् एका ऑपरेशन दरम्यान नीलेशच्या पायाला गोळया लागल्या होत्या. धाडसाची सवय असल्यामुळे मनीषने स्पेशल ट्रेनिंग घेऊन अतिरेक्यांशी दोन हात करण्यासाठी पॅरा फोसेर्सची निवड केली होती. त्याला जुन्या वस्तू गोळा करण्याचीही फार आवड होती. त्याच्याजवळ अनेक जुन्या वस्तूंचा संग्रह आहे. मनीष आठवणींमधून आमच्या सोबत असेल हे सांगताना वृंदा पाथरकर यांना अश्रू आवरणं कठीण जात होतं.