ती अलगद अलगद....

मज नका पुसू हे.... काय कसे अन केव्हा होते
ती अलगद अलगद मनात माझ्या येऊन जाते !


ती कधी धीट अन कधी सलज्ज लाजाळूसम
ती कधी साय अन कधी तळपत्या तलवारीसम
ती कधी तशी अन कधी अशी....तरी भावून जाते
ती अलगद अलगद मनात माझ्या येऊन जाते !


ती पुसते मजला 'का म्हणशी मज खुळी - दिवानी,
मी कुठे मागते... स्वप्ने वा..... मोत्यांची दाणी ?'
तिज नसेच ठाऊक... स्वप्नामधुनी भेटून जाते
ती अलगद अलगद मनात माझ्या येऊन जाते !


तिज वेढून घेता... हळू उमलती मनात गाणी
ती नसे कुणी तरी... दाटून येते डोळा पाणी
ती मुकेपणाने कुठली भाषा बोलून जाते
ती अलगद अलगद मनात माझ्या येऊन जाते !


मी पेटून उठलो कधी चुकून... हो सावली माझी
कधी गुन्हा घडला नकळत तर हो माऊली माझी
बस इतुकेच दान.... हळवे मन हे मागून घेते
ती अलगद अलगद मनात माझ्या येऊन जाते !