एका मनोगतीची डायरी

२.४
छे! काय दिवस आलेत... आज इतकी सुंदर कवित लिहिली मनोगतावर. पण एक प्रतिसाद येईल तर शपथ्थ... काय करावं?
आज ऑफिसमधे वीकली रिपोर्ट द्यायचा होता. पण या कवितेच्या नादात राहूनच गेलं. आता उद्या होईल मारामारी. होऊ दे बघून घेऊ. पण अजून एकही प्रतिसाद कसा नाही?
बाकी कोणी नाही तरी भटकेराव नक्कीच देतील. द्यायलाच हवा. म्हणाले होते ते तसं. छे! उगाचच निश्चय केला की अर्धा तास याहू निरोपकाला हात लावायचा नाही. भटकेरावांशी बोललं नाही तर वेळ कसा पुढे सरकतच नाहीये असं वाटतंय.
त्यात ही उउर्ध्वश्रेणीकरणाची कटकट. मनोगताचं पान उघडायला किती वेळ लागतोय.... एवढ्यात एखादा प्रतिसाद आला असेल का? जाऊ दे. बघावंच उघडून.


 


 




 



४.४
जीव अवदी हळहळला आहे. परवाची कविता कोणीच वाचली नाही. शेवटी मलाच 'मनाली' आयडीवरून 'फारच छान' असा प्रतिसाद द्यावा लागला. तरीही कोणाचंच लक्ष नाही.  हे मनोगती लोक आत्ता झोपा काढताहेत की काय?
हां बरोबर. भारतात आत्ता रात्र असणार ना... आज मी प्रतिसाद देऊन कविता पुन्हा वर आणली आहे. आज जर इतर कोणी प्रतिसाद दिले नाहीत तर काय बरं करावं?
हा. आपल्याच 'खर्डेघाशी' आयडीवरून एक नकारात्मक प्रतिसाद ठोकून द्यावा. हे जर असंच चालू राहिलं तर मला अजून एक आयडी काढावा लागणार आहे. किती ते आयडी आणि त्यांचे ते परवलीचे शब्द. आता नवीन नाव तरी कुठून आणावं? मुलामुलींच्या नावांची पुस्तकं सुद्धा पालथी घालून झाली. इतका त्रास बंड्या आणि बबीच्या बारशांच्या वेळी पण नव्हता झाला....


 


 


 


 


 


 



७.४
सापडला बुवा एकदाचा आयडी. माणक्या. आता मोत्या, हिऱ्या, रत्ना वगरे आयडी घेता येतील. पण ती मेली मोहिनी सगळे आयडी काढल्या काढल्या ओळखून काढते. काय जादू करते कोण जाणे.
आज चिंतूरावांनी नवी गज़ल टाकली आहे. चांगली आहे. आज एक गज़लच लिहावी. नाहीतरी ऑफिसमधले सगळे गेले आहेत सिनेमाला. घरी गेलं की काही होणारच नाही. वेळ सत्कारणी लावावा. पण ही गज़ल कुठल्या आयडी वरून टाकावी बरे? ते मरू दे. आधी गज़ल तर पूर्ण करावी.

नकोनको मी म्हणून सुद्धा  अखेरीस ती निघून गेली

निघून गेली? हे म्हणजे अगदी साधं वाटतंय. भटकेराव म्हणतात तशी यात काव्यमयता कुटून कुटून भरून ठेवायला हवी. असं करावं का?

नकोनको मी म्हणू किती


हां हे छान आहे.
आता म्हणू किती ला यमकं शोधायला हवीत.
विणू किती
गणू किती
वर्णू किती
खणू किती
जणू किती
भणू किती
किंवा मग मती गती स्तुती क्षिती पाहती राहती वाहती टाकती


छे बुवा या यमकांनी अगदी रडवलं. उद्या पाहू काय करायचं ते.


 


 


 


 



 


१०.४
आज एक मुक्तछंदच लिहिला.

माझ्या विमानाच्या खिडकीतून बाहेर दिसणारं आकाश
माझ्या मनाला घेऊन जातं
दूर दूर घरी
तेंव्हाच दोन कोवळे हात
घालतात मिठी पायाला
आणि खेचतात मागे

(बबी रडायला लागली वाट्टं पुन्हा.... काय करावं कार्टीपुढे? जरा शंत बसू देत नाही)

जावं तर मन सुखवेल पण त्या कोवळ्या हातांनी काय करावं?
त्यांचं खेळणं होऊ शकशील का हे आकाशा


पाहू या हिला किती प्रतिसाद येताहेत ते. किंवा असं केलं तर? आधी व्यक्तिगत निरोप पाठवावेत की प्रतिसाद द्या.
आज मनोगतावर दोन नवीन कवी आले. ओळख करून घेतली पाहिजे. सध्या त्यांना गाजर दाखवायला हवं. नंतर आपोआप प्रतिसादांमधे दोनाची भर पडेल. जर त्या बापूंना एवढे प्रतिसाद मिळतात तर मला जस्त प्रतिसाद मिळालेच पाहिजेत.


 


 


 


 


 



१५.४
आज कित्ती आनंदाचा दिवस आहे. मनोगताच्या पहिल्या पानावर माझी कविता झळकतेय आणि पंचवीस  प्रतिसाद पण आलेत. आज सगळी कामंधामं सोडून मनोगतासमोरच बसावंसं वाटतंय. या पानाचा प्रिंट स्क्रीन घेऊन डेस्कटॉपवर लावून ठेवला आहे. शिवाय चिंतूराव आणि भटकेराव दोघांनीही त्याला छान असं म्हटलंय. आज आनंद साजरा कसा आणि किती करू हेच कळत नाहीये. काल रविवारी सुद्धा ऑफिसला गेल्याचं सार्थक झालं अगदी.(फोन वरून कवितेचं मार्केटिंग जरा अंगाशी आलंय. या महिन्याचं फोनबिल घरी न दिसू देणंच चांगलं नाहीतर सगळे फोन कायमचे बंद होण्याची भिती आहे... पण या यशापुढे सगळं फोल आहे)


 


 


 


 


 


 


 २०.४


काय बरे करावे? इथे तर आपलं डोकंच चालत नाही. इतके कष्ट करून, कुथून, मेंदूची सालपटं काढून आम्ही गज़ला लिहायच्या आणि त्यांच्याकडे कोणीच लक्ष द्यायचं नाही? एकही विडंबन नाही आमच्या वाट्याला. आम्ही काय आयुष्यभर फक्त दुसऱ्यांच्या विडंबनांना वा वा किंवा हहपु असंच लिहीत बसायचं का? हर हर....


 


 


 


 



 


४.५
आज दोन आठवडे झाले जीव नुसता तळमळतो आहे. माझ्या शिरपेचात हाही तुरा खोचायलाच हवा ना. आज मी पण विडंबन करणार. कविता विभागात एक कोरी गज़ल सापडली. अजून कोणाचं इकडे लक्ष गेलेलं नाही.आता पटपट कामाला लागायला हवं.
पहिला शेर आहे

वेळ सांभाळून त्यांनी वार केला
देह गेलेलाच होता गार केला

याचं काय बरं करावं? विडंबनात दारूचं स्थान वरचं आहे तेंव्हा दारूच आणावी इथे. तीसुधा सूचकतेने


खेळ सांभाळून त्यांनी बार केला
माल नेलेलाच होता गार केला

वा! काय सुरेख जमून आलाय. पाठच थोपटली पाहिजे हो आपली...


आता हा दुसरा शेर

राहिली ना कोणती मागे निशाणी
मीच त्याला फत्तराने ठार केला

उम्म्म याचं काय काय बरे करावं?
हां. पहिली ओळ तशीच ठेवलेली चालते ना....

राहिली ना कोणती मागे निशाणी
लगक्रम:- गा̱ल̮गा̱गा̱ गा̱ल̮गा̱गा̱ गा̱ल̮गा̱गा̱ असा आहे... सोपं आहे
उंदराला मांजराने ठार केला.......


हुश्श झालं बाबा एकदाचं विडंबन. टाकलं सुधा मनोगतावर. माझं पहिलंच विडंबन ना... इथे नोंद ठेवलीच पाहिजे


खेळ सांभाळून त्यांनी बार केला
माल नेलेलाच होता गार केला


राहिली ना कोणती मागे निशाणी
मांजराने उंदराला ठार केला.


कालच्या दाटून आल्या भावनाना
टाळले मी तोच रस्ता पार केला


आणलेली चार पुष्पे ओवुनी मी
देवराया हा तुम्हाला हार केला


पाउलांना ओळखीची वाट नाही
जाउ दे ना काय तंटा यार केला


आज सुखाची झोप लागेल.



(to be continued...)


टिंबक्टू