भगवद्गीता एक अनोखे पठण

शुक्रवार दिनांक, २४ नोव्हेंबर २००६ रोजी, १४, बटरफ्लाय लेन, डेलावेअर, उत्तर अमेरिका, येथे " भगवद्गीता एक अनोखे पठण " नावाचा एक आगळावेगळा कार्यक्रम पाहावयास / ऐकावयास मिळाला. दादर, मुंबई, येथे राहणारे, श्री. चंद्रकांत ( श्रीकृष्ण ) जोशी यांनी हा कार्यक्रम सादर केला. निमित्त होते त्यांचा मुलगा ( समर्थ ) आणि सुनबाई ( सौ.राधिका ) यांच्या नवीन घराच्या वस्तुशांतीचे.


कार्यक्रमाचे नाव होते " भगवद्गीता एक अनोखे पठण ". ६०-७० श्रोत्यांच्या उपस्थितीत सादर केलेल्या या कार्यक्रमात श्रोत्यांनी भगवद्गीतेतील कोणत्याही अध्यायातील कोणताही क्रमांकाचा श्लोक विचारला तर श्री. जोशी ताबडतोब तो श्लोक म्हणून दाखवत होते. उदा. १३ व्या अध्यायातील १६ वा श्लोक कोणता? श्री. जोशींनी लगेच, " हा श्लोक भगवंतानी सांगितला आहे आणि तो श्लोक आहे, अविभक्तं च  भूतेषु विभक्तमिव च स्थिथम्--------" असे १०-१२ श्लोक विचारले गेले.


त्यानंतर या कार्यक्रमाचा पुढील अनोखा भाग सुरु झाला. भगवद्गीतेत एकूण ७०० श्लोक आहेत. १ ते ७०० श्लोकातील कोणताही क्रमांक विचारला तर श्री. जोशी तो विविक्षित श्लोक म्हणून दाखवत होते. उदा. ४२३ वा श्लोक कोणता? असे विचारल्यावर श्री. जोशी यांनी, " हा श्लोक ११ वा अध्यायातील ९ वा श्लोक असून संजयाने सांगितला आहे. तो श्लोक आहे, एवमुक्त्वा ततो राजन्महायोगेश्वरो हरिः---------. असे २० - २२ श्लोक विचारले गेले.


यानंतर, सौ.मनिषा कामत आणि श्री. आशय जावडेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत श्री. जोशी यांनी सांगितले " मी वयाच्या ६४ व्या वर्षी गीता पाठांतरास सुरुवात केली. दररोज एक या प्रमाणे ७०० श्लोक २ वर्षात पाठ व्हावयास हवे होते. पण ३ वर्षे लागली व नंतर अनोखे पठणाला आणखी १ वर्ष लागले. दररोजच्या सरावात मी संपूर्ण गीता १ ते ७०० श्लोक व ७०० ते  १ असे उलटे म्हणतो. त्याशिवाय माझ्या सौभाग्यवती, सौ‌. शरयु, मला दररोज १००-१२५ क्रमांक ( क्रमाने नाही ) विचारतात.


पुढील उपक्रमा विषयी विचारले असता, श्री. जोशी म्हणाले " २०५ मनाचे श्लोक पाठ करावयास घेतले आहेत. त्याचेही नाव आहे, मनाचे श्लोक एक अनोखे पठण."


श्री. जोशी यांचे दूरध्वनी क्रमांक :
उत्तर अमेरिका - ३०२ ८९२ २८८७
हिंदुस्तान - २२ २४३००८१७ 


गुरुजी