शब्दार्थाची शिक्षा

मी दादरकर यांनी लिहिलेल्या म्हणींच्या राज्यातील फेरफटका ह्या लेखात दिलेली अनेक भाषांमधल्या म्हणींमधील साम्यस्थळे वाचताना द.दि.पुंडे यांनी लिहिलेल्या "भयंकर सुंदर मराठी भाषा" या पुस्तकातील "शब्दार्थाची शिक्षा" हा लेख आठवला.

भारतात भाषिक विविधता आहे, पण संस्कृत भाषेच्या पूर्वपरंपरेमुळे एका भारतीय माणसाला दुसर्‍या भारतीय माणसाची भाषा कळणे जड जात नाही असे म्हणतात, ते तितकेसे खरे नाही. उलट एखादा स्वभाषेतील शब्द परक्या भाषेत वेगळ्या अर्थाने आला तरी त्याचा स्वभाषेत जो अर्थ आहे तोच घेतला जातो व घोटाळा होतो.

अनेक भारतीय भाषा संस्कृतपासून जन्मलेल्या असल्या तरी त्यातून आलेला एक शब्द अनेक भाषांमध्ये आपण वेगवेगळ्या अर्थाने वापरत असतो. सत्कार ह्या शब्दाचे उदाहरण सर्वांच्या परिचयाचे आहेच.

संताप या शब्दाचे असेच आहे. बंगाली व कन्नडमध्ये हा शब्द "शोक" या अर्थाने वापरला जातो. उदा: "मुख्यमंत्र्यांच्या निधनाबद्दल जनतेने संताप व्यक्त केला."  

साक्षर हा शब्द गुजरातीत "विद्वान" या अर्थाने वापरण्यात येतो... मात्र मराठीत याचा अर्थ नेमका उलट आहे. जेमतेम लिहिता वाचता येणार्‍या माणसाला आपण साक्षर म्हणतो.    

आपण मराठीत जंतू म्हणतो ते सूक्ष्म जीवांना; मात्र बंगाली व तेलुगूमध्ये वाघासारख्या मोठमोठ्या प्राण्यांना जंतू म्हणतात.   

कौतुक हा शब्द बंगाली भाषेत "हास्यास्पद ठरवणे" या अर्थाने वापरला जातो. मराठीच्या किती विरुद्ध अर्थ आहे हा.   

हिंदी भाषेची "शिक्षा" ही देशातील सर्व राज्यात भोगावीच लागते.   

हाच लेख येथेही वाचता येईल.