आपण सहसा डॉक्टर स्त्रीला डॉक्टर म्हणतो, वकील स्त्रीला वकीलच म्हणतो पण डॉक्टर पतीच्या पत्नीला मात्र डॉक्टरीणबाई वा वकिलाच्या पत्नीस वकीलीणबाई म्हणतो. जर हुद्दा दर्शवायचा असेल तर त्या हुद्द्याचा लिंगबदल करायची गरज नाही. क्रिकेटमध्ये महिला खेळाडूंना फलंदाजीण/ गोलंदाजीण/ यष्टीरक्षिका, क्षेत्ररक्षिका असे म्हणत नाही कारण कर्ता पुरुष वा स्त्री हा मुद्दा नसून क्रिया वा वर्तन महत्त्वाचे आहे, कर्त्याचे लिंग गौण आहे.
मुळात कोणे एके काळी ही पदे पुरूष भूषवीत असल्याने पुरूषप्रधान नामे निर्माण झाली असावीत, मात्र बदलत्या काळात त्या नामांकडे व्याकरण म्हणून न पाहता हुद्दा व कर्तव्य या दृष्टीने पाहावे. एखाद्या कुटुंबात पत्नी नोकरी करत असेल आणि पती घर सांभाळत असेल तर त्या पुरुषाला काय गृहण म्हणायचे?
ही शक्यता व आवश्यकता लक्षात घेता राष्ट्रपती ऐवजी राष्ट्राध्यक्ष हा शब्द सर्वमान्य व संमत करावा. मुळात राष्ट्रपती हे जरा खटकते. कारण पती ही जन्मोजन्मी साथ सोबत देणारी संकल्पना आहे या उलट हे पद कालबद्ध आहे, त्या व्यक्तीला ते पद विशिष्ट कालावधीनंतर सोडावेच लागते, मग आधी लग्न आणि नंतर घटस्फोट असा प्रपंच कशाला?