सन्जोप राव, आपण स्वतःच आता दुराग्रहाकडे झुकत चालले आहात असे मला वाटू लागले आहे.
जे 'आपले' आहे, ते आपण जपावे, हे आपल्याला मान्य नाही का? दुसरे कोणी येणार आहेत का, जपणूकीसाठी?
मराठीच्या बाजूने बोलणाऱ्या प्रत्येकास ईंग्लिशची अपरिहार्यता चांगलीच ठाऊक आहे. ते आपण सांगण्याची गरज नाही.
आपल्या कवितेवरून तरी असे दिसते की मराठीला काहीच भविष्य नाही, ती अगदीच मरायला टेकलेली किंवा मेलेली भाषा आहे असा आपला समज आहे. (संदर्भ: 'मज आज नको, मज काल प्रिय हा भारी','पूजेस भुताच्या सजवू त्याचे प्रेत') माझे अनुमान खरे असेल तर मनोगत ही आपली जागा नव्हे, असा एक सल्ला द्यावा वाटतो.
प्रतिशब्द शोधावेत, ते वापरात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, मराठी जगवावी, वाढवावी असे वाटणे म्हणजे जर 'चल पुढे म्हणोनि पळुया आपण आत' आणि 'या गच्च बांधुया सगळ्या खिडक्या उघड्या' आहे असे आपल्याला वाटत असेल तर बोलणेच खुंटले.
व्यवहारासाठी, गरज म्हणून ईंग्लिशची कास आपल्याला सर्वांनाच धरावी लागली आहे. पण याचा अर्थ असा नाही, की 'सूर्य' तिकडे आहे. एकाच व्यक्तीचे ईंग्लिशवर प्रभुत्व आणि मराठीवर प्रेम, मराठीबद्दल कळकळ हे दोन्ही असू शकते हे आपल्याला मान्यच नाही असे वाटते. मराठी ती 'पळुया आपण आत', 'वेडेविद्रे', 'जडशीळ बेड्या', 'शब्द कुबटले आत' आणि ईंग्लिश म्हणजे 'पुढे पळणे' 'सूर्य' असे आपले मत का आहे, याचा खुलासा व्हावा.
आणि,
मी किंवा माझा बंधू 'दारचे कुत्रे' असावा, आणि आमची जात कायमच 'भिकारी' रहावी, असे मी काय कोणीच म्हणत नाही. मराठीचा आग्रह धरणारे प्रतिगामी आहेत, प्रगतीच्या वारूवर स्वार न होऊ शकलेले आहेत असे आपल्याला वाटते का? ईंग्लिशशी पाट लावायला मराठीच्या नावाने आंघोळ केलीच पाहिजे अशी काही अट असल्याचे मला तरी माहित नाही.
करा की प्रगती हवी तेवढी. जा की सूर्याच्या दिशेने. पण त्याचबरोबर जे आपले आहे, ते विसरू नका, ते जपा, वाढवा, इतकेच मला म्हणायचे आहे.