इंग्रजी शब्दाचे शब्दशः संस्कृत भाषांतर करून तो शब्द मराठी म्हणून वापरण्याने भाषा बोजड होते.  असे करायची काहीही गरज नसते.  इंग्रजी शब्दामागचा गर्भितार्थ लक्षात घेऊन मराठी संस्कृतीला शोभेल आणि गरज पडल्यास एकापेक्षा अधिक शब्द वापरून तो भाव मराठीत आणला की कार्यभाग साधतो.  एका इंग्रजी शब्दाला एकच मराठी प्रतिशब्द आणि एका मराठी शब्दासाठी एकच इंग्रजी शब्द ही कल्पना मनातून काढून टाकली पाहिजे.  शब्द उच्चारायला आणि लिहायला सोपे असले की शब्दशः अर्थ जुळत नसला तरी शब्द रूढ होतात.  कल्याण-डोंबिवली म्यूनिसिपल कॉर्पोरेशन चे भाषांतर कलवली महापालिका केले तरी अर्थपूर्ण होईल.  तसेच पिंपरी चिचवडला पिंचवड, भिवंडी-निजामपूरला भिनिपूर हे शब्द वापरले तर ऐकणे, बोलणे, लिहिणे सोपे होते.