मुक्तछंद तुमचे विचार पटले. अगदी सहमत. नेहमी पारंपरिक विचार करण्याच्या पद्धतीत आपण अडकल्याने अनेकदा दोनच बाजूंचा विचार करतो, तिसरीचा नाही. तिसरी बाजू ही समतोल राखणारी असू शकते, हेही आपल्याला अनेकदा मान्य नसते. अगदी माझ्याबाबतही काही वेळा असे घडलेय. मध्यंतरी मला समकालिन संगीताविषयी (म्हणजे हिमेश रेशमिया आदी.)  खूप वाईट वाटू लागले होते. हे संगीत म्हणजे संगीत नाहीच, अशी आवड कशी असू शकते बुवा वगैरे प्रश्न मला पडत. पण नंतर दुसर्‍या (माफ करा तिसर्‍या) बाजूने विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आले, की हजारो, लाखो लोकांनाही हिमेश रेशमिया आवडतो, ठीक आहे, त्याची चार गाणी आपल्याला आवडत नसली तर इतरांना मात्र आवडतात. शिवाय त्याच्या ठेक्यात नवी पिढीही गुंगते. नाचते. मग या पिढीला संगीतातले काहीच कळत नाही, असे धाडसी विधान करायचे का? विशेष म्हणजे अशीही काही तरूण मंडळी आहे, जी जुनी गाणी ऐकतात. शिवाय हिमेशलाही ऐकतात. मग त्यांना काहीच कळत नाही, असे कसे म्हणायचे. नव्या पिढीच्या आवडीला नावे ठेवण्यापेक्षा त्यांच्या आवडीला समजून घेणे मला जास्त योग्य वाटते. माझ्या मते या प्रश्नाची ही तिसरी बाजू आहे. भलेही मला हिमेश आवडत नसला, तरी इतरांनाही तो आवडू नये हा टोकाचा विचार झाला.