(आमच्या) जळगावच्या प्रतिभाताई पाटील कायदे विषयक ज्ञान प्राप्त करून वाकील झालेल्या आहेत. राजस्थानातल्या शेखावतांशी सोयरीक केल्याने मूळ मराठी खानदेशी कन्या राजस्थाची 'बहू' झाली. श्रीमती इंदिरा गांधींच्या काळापासून काँग्रेसशी एकनिष्ठ आहेत व म्हणूनच त्याची बक्षिसी (शिक्षा ?) त्यांना ह्या रूपाने मिळाली असावी.
प्रथमच एका महिलेला राष्ट्रपती पदावर येण्याचा मान कदाचित त्यांना मिळेल पण मग राष्ट्रपती असे त्यांना संबोधावे का हा संशोधनाचा विषय होईल .
क्वालिफिकेशन (अहर्ता) ही अनेक मार्गांनी सिद्ध करता येते.....(कोणाची अहर्ता वादंग माजवण्यात असते तर कोणाची दुसऱ्यांवर टिका करण्यात.) प्रतिभाताईंची शैक्षणिक व राजकीय अहर्ता वर दिलेली आहेच पण अधिक माहितीसाठी २/३ दिवसांपूर्वीचा म.टा. वाचा (कंटाळा आल्याने येथे दुवा देत नाही.)
सेनेचे नायक सध्या दुविधेत असावेत. मराठीची कास धरावी तर भाजपाशी प्रतारणा करावी लागेल व शेखावतांना मतदान केल्यास मराठी कन्येच्या विरुद्ध मतदान केल्याचा आरोप होईल. खरोखरच राष्ट्रपती पदाची निवडणूक सेनेसाठी अवघड जागेचे दुखणे झाले आहे.
सुनीता विल्यम्स भारतीय मुळाची असली तरी राकेश शर्मा अंतराळात गेला त्याचा जो अभिमान भारतीयांना झाला तो सुनीताच्या जाण्याने झाला नाही; पण प्रतिभाताई पाटील राष्ट्राध्यक्षा झाल्यास महाराष्ट्राची कन्या सर्वोच्च पदावर विराजमान झाल्याचा आनंद मराठी वर्गाला (काहींना पोटशूळ) होणारच ! 
आजवरचा महापौर, राज्यपाल व राष्ट्रपतींच्या पदांचा उपयोग बघितल्यास त्यांचे पद हे शोभा वाढवणारे किंवा राजकीय सोय म्हणून उपयोगात आणल्याचे जास्त जाणवते.
कलाम साहेबांची कारकीर्द सर्वांच्या मानाने बरीच उजवी होती. त्याला डागाळणी न देता त्यांनी आता निवृत्त व्हावे असाच सर्वपक्षीय प्रयत्न दिसतोय. डाव्यांनी पछाडले; काँग्रेसने सोडले व एन.डि.ए.ने तोडले अशी अवस्था असताना त्यांनी सन्मानपूर्वक निवृत्त होण्यातच शहाणपणा दिसतोय.
महाराष्ट्र कन्या प्रतिभाताई पाटील भारताच्या राष्ट्राध्यक्षा व्हाव्यात ही माझी तरी मनोमन इच्छा आहे.