प्रतिभाताईंनी राष्ट्रपती होणे ही जळगांवच्या आणि समस्त मराठी लोकांसाठी भूषणावह अशी गोष्ट आहे. बाकी त्यांची अर्हता, राजकीय अनुभव, त्यांचे सामान्य जनतेसाठी काम करण्याचे कौशल्य या जरा विवादास्पद गोष्टी आहेत. आमच्या गावाजवळ (मुक्ताईनगर पूर्वीचे एदलाबाद) त्यांनी उभारलेला साखर कारखाना फारच लवकर आजारी पडला. विशेषतः ऊसाचे इतके अतिरीक्त पीक झाले असतांना आणि सगळ्या ऊसाचे गाळप न होऊ शकल्याच्या पार्श्वभूमीवर या कारखान्याचे व इतर अनेक कारखान्यांचे बंद असणे ही काही फार चांगली गोष्ट नव्हती. ऊसाचे क्षेत्र जवळपास कुठेही नसतांना अशा ठिकाणी साखर कारखाना उभारला गेला याचे सगळ्यांनाच आश्चर्य वाटत होते. शिवाय त्याला साखर कारखान्यासाठीच्या आवश्यक असलेल्या विविध प्रकारच्या मंजुरी, आर्थिक अनुदान, बँकेचे पाठबळ या सगळ्या गोष्टी कुठल्याही नियमांच्या चौकटीत न बसून देखील विनासायास मिळाल्या असे ऐकीवात आले होते.

त्यांची काँग्रेस आणि गांधी कुटुंबाशी एकनिष्ठता, निर्विवाद कारकीर्द, महिला असणे आणि सक्रीय राजकारणात त्यांची लक्षात न येणारी अनुपस्थिती या गोष्टी मात्र त्यांच्या पथ्यावर पडल्या. सत्ताधारी पक्षांना अशीच एखादी व्यक्ती राष्ट्रपती म्हणून हवी असते. अशी एक व्यक्ती जिच्या राजकीय महत्त्वाकांक्षा खूपच कमी आहेत, जी राजकारणात आणि विशेषतः पक्षात जास्त सक्रीय नाही, जी एकनिष्टतेच्या नावाखाली केवळ एक कळसूत्री बाहुले बनून राहील अशी व्यक्ती सत्तधारी पक्षाच्या दृष्टीने खूप सोयीची असते. शिवाय पहिली महिला राष्ट्रपती बनवण्याचा मान देखील काँग्रेसला सहजी मिरवता येईल. यामागे खूप चांगला आणि आपले अधिकार जाणीवपूर्वक राष्ट्रहितासाठी वापरणारा आणि निष्पक्षपातीपणे देशाच्या भल्याचा विचार करणारा उमेदवार देशाला द्यावा इतका निर्भेळ हेतू काँग्रेसचा अजिबात नाही. मुळात आपल्या देशात इतका विचार करून राष्ट्रपतीची नेमणूक केली जात नाही कारण तसे पाहिले तर राष्ट्रपती हे एक बिनबुडाचे पद आहे. केवळ सर्वोच्च पद म्हणून त्या पदाचे खूप उदात्तीकरण करण्यात आले आहे.