श्री. द्वारकानाथ,

मी १९९० साली पाकिस्तानात एक ट्रँझीट पॅसेंजर म्हणून एक दिवस राहून आलो आहे.

PIA या पाकिस्तानच्या नॅशनल एअर लाइन्सच्या मस्कत - मुंबई - व्हाया - कराची अशा तिकिटावर मी प्रवास केला होता. ट्रँझीट पॅसेंजरला व्हिसा लागत नाही. एअर्पोर्टवर आम्हा सर्व प्रवाशांचे (असे २०-२५ होते) पारपत्र, इमिग्रेशन अधिकार्‍यांनी ताब्यात घेतले. नंतर एका बसने आम्हा सर्वांना एका ३ कि ४ तारांकित हॉटेलात एका खोलीत २ माणसे असे  ठेवण्यात आले. नाश्ता, जेवण आणि राहण्याचा खर्च, सर्व PIAचे होते. (त्या मुळे चिंता नव्हती).

हॉटेल बाहेर जाण्यास आम्हाला परवानगी होती. ही परवानगी त्या काळातल्या भारत-पाक संबंधांवर अवलंबून असते. म्हणजे संबंध चांगले असतील तर, असते आणि बिघडले असतील तर, नसते. मी गेलो होतो तेंव्हा नशिबाने संबंध चांगले होते. हॉटेलात प्रतिक्षा कक्षात एक वादक पियानोवर 'शोर' सिनेमातील 'एक प्यारका सागर है' ही धून धड वाजवायचा प्रयत्न करत होता. एक संध्याकाळ माझ्या हातात होती. एवढ्या तुटपुंज्या वेळात किती निरिक्षण करणार आणि कोणाकोणाला भेटणार? हॉटेलच्याच अंतर्गत एका विक्रिकेंद्रात गेलो होतो. तिथे एक वृद्ध दुकानदार होता. चेहर्‍यावरून तो सौम्य वाटल्यावरून त्याच्याशी भारत पाकिस्तान संबंध, एकिकरण, राजनिती, माणसं, सामाजिक आणि राजकिय प्रगती (स्वतंत्र्या नंतर) यावर एक-एक प्रश्नांची चर्चा केली. त्या अर्ध्यातासात मी पाकिस्तानबद्दल गोळा केलेली माहिती अशी होती:-
१) पाकिस्तानी लोकांना भारताशी वैर नको आहे.
२) जमिनपर लकिर मारनेसे मुल्क बट सकते है मगर इन्सान, इन्सानियत नही बट सकती. (क्या बात है) 
३) राजकारणी लोकं स्वार्थासाठी वैराला खतपाणी घालत आहेत.
४) स्वतंत्र झाल्यामुळे पाकिस्तानचे नुकसानच झाले आहे. भारत सर्वच क्षेत्रात कितितरी पुढे निघून गेला आहे.
५) दोन देश एकत्र होणं आता शक्य नाही पण शांततेने नांदू लागले तरी खूप सुखी होतील. त्यांना शिक्षण, आरोग्य, दळण-वळण, आधुनिकीकरण यावर जास्त लक्ष देणं शक्य होईल.

या मुद्द्यांबरोबरच जूनी मुंबई, दिल्ली या शहरांवर सौहार्दपूर्ण चर्चा झाली. मृत्यूपूर्वी एकदा तरी मुंबईला भेट देण्याची त्यांची ईच्छा होती.

भारताचे चलन त्या काळात पाकिस्तानी चलनापेक्षा अधिक महाग होते. पण ही गोष्ट हॉटेलच्या परकिय चलन विनिमयाच्या दुकानातील कर्मचार्‍यंना अजिबात मान्य नव्हती. विनिमयाचे दर कुठे दिलेले नव्हते. (ते म्हणतील तो दर). भारतिय रूपयाला जेवढ्यास तेवढे पाकिस्तानी रुपये मिळाले. जेऊन, बाहेर चक्कर टाकण्यास गेलो असता एका पानाच्या दुकानात १ रूपया देऊन २० पैशाची काड्यापेटी घेतल्यावर बाकीचे पैसे 'मागून' घ्यावे लागले.
बाकी माणसं, जेवणातील पदार्थ, माणसांचे स्वभाव यात विशेष फरक जाणवला नाही.
परतीच्या प्रवासाच्या वेळी आमचे पासपोर्ट विमानतळावर परत करण्यात आले. 
पाकिस्तानात जास्त वास्तव्यासाठी पाकिस्तानचा व्हिसा काढावा लागतो. (दिल्लीच्या पाकिस्तान वकिलातीत अर्ज करावा.)
तिथे कोणी पाकिस्तानी मित्र असेल तर पाकिस्तानात भटकणे, लोकांना भेटणे, सर्वसमस्यांवर स्थानिकांशी चर्चा करणे इत्यादी शक्य होईल. अन्यथा, ट्रॅव्हल एजंटच्या माध्यमातून फक्त प्रेक्षणिय स्थळांची यात्रा करता येईल.
मला वैयक्तीकरित्या यायलाही आवडेल. पाकिस्तानात ओळख काढणं कठीण नाही. एक-दोन मित्र आहेत. फक्त कामातून वेळ मिळणे आणि व्हिसा मिळणे या दोन गोष्टी जुळून आल्या पाहिजेत.

धन्यवाद.