कित्येक परभाषिक शब्दांचा स्वीकार मराठीने केला आहे त्यात संस्कृतपासून इंग्रजीपर्यंत अनेक भाषांचा समावेश आहे. शब्दकोशात प्रत्येक प्ररभाषिक शब्दाचा मराठी अर्थ दिलेला असतो. ते मराठी शब्द आपण उपयोगात आणू शकतोच. एखाद्या परभाषिक शब्दाचा उपयोग करायचा किंवा करायचा नाही हा प्रश्न त्या त्या व्यक्तीवर सोडून द्यावा. परभाषिक शब्द मराठी नाहीत असे म्हणून त्यांचा वापर करू नये अशी जर भूमिका असेल तर प्रथम त्यांना शब्दकोशातून हाकलून लावण्यास एक मोठी मोहीम हाती घ्यावी लागेल. असे करतांना फक्त ही भाषा नको आणि ती चालेल असे मात्र करु नये. संस्कृत, हिंदी आणि कन्नड आपल्या भाषा इतर सर्व परक्या म्हणून त्या नको असा भेदभाव नसावा. (तसे अरबी, फारसी भाषेतले सर्व शब्द काढून टाकण्यास पुढाकार प्रथम घ्यावा.) शब्दातून नेमका अर्थ व्यक्त होतो आहे ना ते पाहिलेच पाहिजे. टोपी, पगडी, हॅट आणि फेटा यांचा उद्देश एकच असला तरी त्या त्या शब्दातून समोरच्या व्यक्तीने डोक्यावर नेमके काय घातले असावे त्याचा अंदाज लावता येतो. प्रतिशब्द वापरतांना हे भान नेहमी राहावे. मराठमोळे मराठी शब्द अनेक आहेत दरवेळी इंग्रजी साहेबाची री ओढण्याचे कारण नाही पण भाकर म्हणून खातांना जर बेकरीतून आणलेला पाव खात असाल तर तो पावच आहे किंवा ब्रेड आहे आणि तो आपल्या मराठी पूर्वजांनी भाजलेला नाही, त्याला भाकर म्हणणे म्हणजे दुराग्रह आहे. आपला सदरा/ झब्बा आणि साहेबाचा शर्ट यांच्या रचनेत मूलभूत फरक आहे तो टाळता येणार नाही. त्यामुळे मी अंगरखा/ झब्बा घालून कार्यालयात जात आहे असे संगितल्यावर दूरध्वनीवर पलिकडून मित्राने ' मंगल कार्यालयात का की सत्यनारायणाच्या पूजेला'? असे विचारले तर मराठीप्रेमींनी दचकू नये.