महाराष्ट्र राकट रांगडा आहे, तोच त्याचा वेगळेपणा आहे. बंगाल लाघवी लोभस आहे तो त्याचा वेगळेपणा आहे. घोडदौड करत चटणीभाकरी खाणारे, भीमेवर पाणी पित असलेल्या घोड्याला आता उरलेली तहान यमुनेवर भागव म्हणणाऱ्यांना शृंगारचिकित्सा करावयास लागणारी स्थिरता इतिहासात कधी लाभली? तथापि, अर्वाचीन काळात श्री. ज. किंवा सु. शी. सारखे अपवाद सापडतीलही. इंग्रजी साहित्य लिहीत असल्या तरी शोभा डे पूर्वाश्रमीच्या राजाध्यक्षच. मधल्या काळातही लोकसंगीतात लावण्या-गवळणींसारखे शृंगाररस जागविणारे अपवाद सापडावेत. पण तरी महाराष्ट्र रंगला तो पोवाड्यातच.
आचार्य अत्र्यांनी चुंबनाबद्दल लिहिले आहे की दुसऱ्याच्या थोबाडात थोबाड घालून काय तो पचाक पचाक आवाज काढायचा? सध्याच्या एका मराठी जहाल हिंदुत्ववादी राजकीय नेत्याने काही वर्षांपूर्वी हिंदी चित्रपटातील बोकाळलेल्या उत्तेजक दृश्यांबद्दल आणि काम-शिक्षणाबद्दल म्हटले होते की प्रजोत्पत्ती कशी करतात ते सगळ्यांस नैसर्गिकरीत्याच ठाऊक असते त्या करिता आपली खाट रस्त्यावर टाकून प्रात्यक्षिक दाखवण्याची आवश्यकता नसते.