मराठी भाषेला किंवा मनोगतालाही शृंगाराचे वावडे आहे असे वाटत नाही. तसे लिखाण कोणी केले आणि प्रशासकानी ते काढून टाकले किंवा इतर मनोगतीनी त्यावर टीकेची झोड उठवली असे झाले तरच असे म्हणता येईल. मराठी भाषेतही रामजोशी, पट्ठे बापुराव यानी शृंगारिक लावण्या रचल्या आहेत. नच सुंदरि करु कोपा हे नाट्यगीतही शृंगारिकच आहे.तसाच विचार करायला गेले तर संस्कृतमध्ये शृंगारिक साहित्य आहे असे आपण म्हणतो पण आपण त्यातले किती वाचले आहे ?म्हणजे त्याविषयी आपले ज्ञान ऐकीव माहितीवरच आधारित आहे‌ शिवाय त्याचा अनुवाद करताना आपण कुणाच्या भावनाना धक्का लागणार नाही अशी दक्षता घेणार त्यामुळे म्हणायचेच झाले तर मराठी माणसालाच शृंगाराचे वावडे आहे असे म्हणावे लागेल. बरे इंग्रजांच्या आक्रमणाचा हा परिणाम आहे असे म्हणावे तर सर्व भाषांवरच (हिंदी,कन्नड,तमिळ इ.)तो परिणाम व्हायला हवा. तो तसा झाला की नाही हे कळण्यासाठी त्या भाषांतील साहित्य वाचायला हवे तरच काही निष्कर्ष निघणार त्यामुळे केवळ मराठीवर असा आरोप करणे अन्यायकारक ठरेल.