हिंदी (खास करुन कपूरनिर्मीत साबणनाट्यात):
१. बायका भरजरी आरसेकामाच्या साड्या, लिपस्टीक, आयलायनर यासह झोपतात आणि उठल्या तरी त्यांचे केस जराही विस्कटलेले नसतात.
२. माणसे घरातही बघावं तेव्हा टायसहित सुटाबूटात असतात.
३. नायिका, खलनायिका व (मालिकेत)आजी नसलेल्या प्रत्येकीचे केस कायम प्रतिज्ञा केलेल्या द्रौपदीसारखे(किंवा हडळीसारखे) मोकळे सोडलेले असतात.
४. मालिकेतली लहान(बाळ) मुले बाकी मोठी पात्रे मोठी व्हायला लागली आणि मालिका वर्षानुवर्षे चालली तरी बाळच राहतात.
५. बायकांचे ५/६/७/८/९ महिने पूर्ण झाले तरी त्यांची पोटे दिसत नाहीत.
६. कोमात गेलेली पात्रे पटकन शुद्धीवर येतात.
७. नायिकेची/नायकाची आई/मावशी/काकू या तुम्हा आम्हा सामान्य तरुण मुली/बायकांना लाजवतील इतक्या तरुण दिसतात व त्यांचे केस फक्त एका पट्ट्यात पूर्ण पांढरे आणि बाकी ठिकाणी काळेभोर असतात.
८. एखादीच रात्र दारु पिऊन झोपून (किंवा पाऊस व शेकोटीमुळे)नायकाचे व आजूबाजूच्या पुरुष पात्रांचे पाय सटासट घसरलेले असतात व प्रत्येक पुरुषाला किमान एक अवैध संतान होणार असते.
९. घर गहाण टाकलेल्या अत्यंत गरीब कुटुंबातही बायकांच्या अंगावर लग्नातल्यासारख्या साड्या ,गळ्यात हिऱ्याचे दागिने आणि पुरुषांच्या अंगावर ग्रासिम इ. सुटिंगचे सूट असतात.   
१०. प्रत्येक गुपिते स्पष्ट व संदर्भासहित आणि पब्लिक जागी चर्चिली जातात आणि बाजूला किंवा दाराआड किंवा पडद्याआड खलनायिकेला लपून ऐकायला जागा ठेवलेली असते.
११. प्रत्येक नायिका भयंकर त्यागमूर्ती असते.
१२. अडचणीच्या वेळी भ्रमणध्वनी उचलले जात नाहीत, पडून फुटतात किंवा खलनायकाच्या हातात असतात.
१३. प्रत्येक मालिकेत एका खोलीचे/हवेलीचे रहस्य असते आणि ते नायिका सोडून सर्वाना माहिती असते.   
१४. नोकरमंडळी कायम दांडियाला निघाल्यासारखी रंगीबेरंगी आणि चकाचक पोशाखात असतात.