रिमिक्सला विरोध नाही. अशीही काही गाणी आहेत जी रिमिक्स करण्याला अगदी चपखल आहेत. उदा. आर डीं. ची गाणी आणि त्यातले ठेके,ओरडणे इ.इ. 'रुप तेरा मस्ताना' चे बाँबे व्हायकिंग ने केलेले रुपांतर, नूरी मधले गाणे, पिया बसंती इ.
काही गाणी उगीचच शोभत नसताना मध्ये बीटस घालून रिमिक्स केलेली दिसतात. ते म्हणजे गाणे चालू असताना घरातल्या लहान मुलाने भांडे बडवावे तसे वाटते ऐकल्यावर.
ही झाली ऐकण्याची गोष्ट. बघण्याचे म्हणाल तर सर्व आनंदच आहे. अगदी नाईलाज म्हणून वीतभर कपडे घालून वेडेवाकडे करत केलेला नाच आणि बऱ्याच गाण्यांच्या शेवटी 'एकत्र रात्री' चे सूचक/उघडे दृष्य दाखवून शेवट हा ठसा ठरुन गेला आहे. यामागे कारण म्हणजे जास्तीत जास्त तसे करुन लोकांच्या नजरेत आपला आल्बम भरवणे हे असावे. अर्थात बऱ्याच आल्बमना नजरेत भरायला हे करायची गरज पडत नाही.
दृष्य ते काय दाखवतात यावर आमचे नियंत्रण नाही, पण 'काहीही गरम व्हिज्युअल केले तर लोक आपल्या टुकार संगीताची सीडी पण विकत घेतील' हा पवित्रा चुकीचा आहे. 'म्युझिक आल्बम' असे नाव असलेल्या प्रकारात संगीत हा मुख्य भाग तरी ऐकायला सुसह्य असावा ही माफक अपेक्षा.