माझे सध्याचे वास्तव्य भारतात नाही, माझी प्रतिक्रिया कदाचित तुम्हाला मानवणार नाही... तुमचा सारखी उलट्या आणि सुलट्या मारणारी आणि जुने ते सोने आणि अभिजात मानणारे (क्रिकेट मध्ये सुद्धा) कमी नाहीत, मी खाली तुमच्या लेखाचे आणि कोत्या विचारांचे वाभाडे काढले आहेत... तुमचे विचार काळ्या रंगात आणि माझे निळ्या रंगात आहेत, मनोगत ला या आपल्या वैचारिक संघषाचे वावडे नसावे....

अभिजात संगीताची पार्श्वभूमी लाभलेल्या भारतासारख्या देशात आज संगीताची चाललेली ससेलहोलपट म्हणजे अतिशय गंभीर बाब बनली आहे. ज्या देशाच्या इतिहासात स्वतःच्या गायकीने दीप प्रज्वलित करणारा तानसेन होऊन गेला त्याचा वर्तमान असा असावा यापेक्षा वेगळं दु:ख आणखी काय असेल? ज्यांनी संगीतासाठी आपलं उभं आयुष्य वेचलं, त्यांच्या संगीताचा पाठपुरावा करणं ही गोष्ट तर दूरंच पण तो ठेवा आपण जपूनही ठेवू शकत नाही.

तानसेन ते आज हे 'ऑन ऑफ' पद्धतीने झालेले नाही. हे सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तन आहे. तानसेनच्या ३ पिढ्या आधीच्या संगीत रसिकांना किंवा आपल्या सारख्या टीकाकारांना कदाचित तानसेन थिल्लर वाटू शकतो. काळाचा महिमा अगाध आहे. ना तानसेन आहेत ना ते समजणारे कानसेन आहेत. सध्याचे दिवस सांडशीने नाक उचलून धरून आणि मफलराने गळा आवळून वाद्यांच्या रणधुमाळीत गेंगण्या आवाजात रेकणार्यांचे आहेत, कारण हेच लोकांना समजते आणि त्यांचे मनोरंजन करते. काळ हे पण गडप करेल.... आपण धीर धरा, उगाच गळे काढू नकात.

         'संगीत' याची व्याख्या करायची झाली तर "गायन, वादन आणि नृत्य यांचा सुरेख संगम." आणि हा संगम जिथे होतो तिथे एक अप्रतिम कलाकृती जन्म घेते. गायनाच्या बाबतीत विचार करायचा झाला तर शास्त्रीय आणि सुगम असे दोन भाग आपण करू शकतो. गाण्यासाठी केवळ आवाजाची देणगी असून भागत नाही तर गीतकाराने रचलेल्या भावना समजून गाणे हे गायकाचे कौशल्य असते. मला मान्य ....

शास्त्रीय गायन शिकायचे झाले तर उभा जन्म त्यासाठी कमी पडेल. (खूपच जास्त वेळ मागत आहात असे नाही का वाटत)  भारतीय संगीतामध्ये असंख्य प्रकारची वाद्ये आहेत. हार्मोनियम, तबला, सितार, तानपुरा, बासरी, सनई अशी अनेक. या सगळ्यातून निघणारे स्वर हे एखाद्याला स्वर्गीय सुखाची अनुभूती देऊ शकतात. आणि म्हणूनच एखादा झाकीर हुसेन आपल्या तबल्याच्या ठेक्यावर प्रचंड जनसमुदायाला खिळवून ठेवू शकतो. नृत्याबाबत बोलायचं तर, कथ्थक, भरतनाट्यम, कुचिपुडी( आणखी जे काही प्रकार असतील ते) या सारखे शास्त्रीय नृत्याचे प्रकार तर आहेतच, लोकनृत्य (शृंगारिक लावण्यांची ऍलर्जी असणारे कमी नाहीत, पठ्ठेबापुरावांना हिणवणारे कमी न्हवते.) आहेत... आणि अशास्त्रीय असेही प्रकार आहेत जे मानवी मनाला भावतात. (प्रत्येकाचे मन वेगळे असते, काहींना भीमसेन भावतात, काहींना अजित कडकडे, काहींना सुरेश वाडकर तर काहींना सुरेखा पुणेकर... मी ह्यात फरक करीत नाही, मनाला भावणे महत्त्वाचे

        पण पोटाच्या वरचा आणि खालचा भाग कोणत्याही दिशेने हालवला की आपण नृत्य करतो असा काहीसा समज रिमिक्सवर व्हिडिओ काढणाऱ्यांचा असतो. हे पूर्वी पण होते, पण दुर्लक्षित होते, आता काही सवंग परीक्षक ह्याच्यावर लिहून स्वतःला शुचिर्भूत मानून स्वतःच्या टेर्या बडवून घेतात. रिमिक्सच नव्हे तर पूर्ण कुटुंबासोबत बसून उपभोग घ्यावा अशी गाणी आज सापडायची अवघड आहेत. शोध घ्या सापडेल, मला सापडले आहे, परदेशात..

मी नवीन गाणी, संगीत आणि नृत्याच्या विरोधात अजिबात नाही. कोणतेही गाणे रिमिक्स करताना त्या गाण्यासाठी खरंतर, ते गाणं संगीतबद्ध करण्यासाठी आधीच्या संगीतकाराने किती श्रम घेतले आहेत हा विचार करण्याची क्षमताच या लोकांच्यात नसते. जे गाणे रिमिक्स केले ते आधी खूप गाजलेले असते आणि म्हणूनच ते रिमिक्स केले जाते. खूपशी गाणी अशी आहेत जी गाजलेली नाहीत,ती गाणी रिमिक्स केली नाही जात कारण मुळातच न गाजलेली गाणी ती रिमिक्स केल्यावर कोण ऐकणार?,  ही भिती.  मुळातच सुंदर असणाऱ्या गीतांना एक-दोन नवीन बिटस घालून नेमकं काय साधायचा प्रयत्न करणार?  किती आगपाखड, काळाच्या ओघात हेही वाहून जाणार आहे.

स्वतःकडे काहीही कला नाही, प्रतिभा तर नाहीच नाही आणि यातून नेमका कोणता संदेश लोकांपर्यंत पोहोचवणार. ज्या गाण्यामध्ये जया भादुरी गोड हसून, अवखळपणे प्रेमाला साद घालते, त्याच गाण्याच्या रिमिक्स्मध्ये कमीतकमी कपड्यांमध्ये नको ते शरीराचे भाग हालवत एखादी 'हॉट' मॉडेल चेहऱ्यावर कामुक भाव दाखवत, बघणाऱ्याची वासना चाळवते. आपण नक्की कुठे चाललो आहोत? अजून २० वर्षांनी हीच हॉट मॉडेल लोकांना अवखळ वाटेल कारण तेव्हाचे नवीन काय असेल ह्याची कल्पना केलेली बरी. माझ्या आजीला जयाचे गोड हसून, अवखळपणे प्रेमाला साद घालणे अगोचर वाटत होते, पाकीझाचे पाय बघून राज घायाळ होतो ते तिला अभिजात वाटत होते.   

       या रिमिक्स करणाऱ्यांची एक मात्र कमाल आहे, ज्या जुन्या गाण्यांमध्ये जास्तीत जास्त शास्त्रीय संगीतावर भर दिला आहे (उदा. बितिना बितायी - परिचय, रैना बित जाए - अमरप्रेम, जा तोसे नहीं बोलू - परिवार) अशा गाण्यांचे रिमिक्स त्यांना करावेसे नाही वाटत. याचे कारण एकतर शास्त्रीय संगीत समजून घेण्याची कुवत नाही आणि दुसरं म्हणजे अशा गाण्यांमध्ये कोणतेही वाद्य 'बडवलेले' लोक स्वीकारणार नाहीत, ही खात्री.  जर इतकीच संगीताची जाण असेल, तर जुनी गाणी कशाला, नवीनंच गाणी जी आधी कुणीही ऐकलेली नसतील, ती घेऊन संगीतबद्ध करून ती लोकांसमोर आणावीत. त्यांच्या संगीतामध्ये प्रभाव पाडण्याची ताकद असेल तर लोक नक्की त्यांची गाणी स्वीकारतील. कोणत्याही गाण्याला रिमिक्स करून, एखाद्या मॉडेलला कमीतकमी कपड्यांत नाचवले म्हणजे आपली प्रतिभा सिद्ध होते हा एक (गोड?) गैरसमज या मंडळींनी करून घेतला आहे. मी सहमत, परंतु समाजात असा एक वर्ग आहे ज्यांना प्रगत साउंड इफेक्ट्स आणि जुन्या चाली व बोल यांचे मिश्रण आवडते. 

मला आश्चर्य वाटते या गाण्याच्या व्हिडिओ मध्ये भाग घेणाऱ्या मुला-मुलींचे आणि त्यांच्या पालकांचे. "तुमचा मुलगा एम.बी.बी.एस. ला पहिला आला, त्याचा फोटो आम्ही पाहिला पेपरमध्ये" हे विधान ऐकल्यावर त्या आई-वडिलांना असमान ठेंगणं झाल्यासारखं होतं आणि ऊर अभिमानाने भरून येतो. पण जेव्हा त्या आई-वडिलांना कोणी विचारतो की," अमुकअमुक गाण्यामध्ये त्या मुलीच्या अंगचटीला जाणाऱ्या मुलांपैकी तो त्या बाजूचा मुलगा तुमचा का?" तेव्हा त्या आई-वडिलांना धरणी दुभंगून आपल्याला पोटात घेईल तर बरं होईल, अशी इच्छा नाही झाली तरच नवल? मध्यम वर्गीय कोती मराठी वृत्ती, अजून काय म्हणू याला. एम.बी.बी.एस., बी. ई., सी. ए., हो टाचा घासे पर्यंत नोकरी कर, २ बी हॅ. की., एक मारुती ८००, थोड्या मुदत ठेवी, संसार सुखाचा.... हो एक राहिलेच पुढची पिढी पण आशीच गांडूळ वृत्तीची बनव... १५-२० तली ही मुले आणि मुली काही वेगळे करून दाखवतात, त्यांना गाईड करा, चांगले वाईट समजवून सांगा, नग बघा त्यांच्या क्रीयेटीवीटीची भरारी... गिरीश कर्नाडचा शंकराभरणम बघीतलाका...

आपण नावीन्याचा स्वीकार जरूर करावा  पण सदसद्विवेक बुद्धी जागी ठेवून. फिल्म लाइन मध्ये जाण्यासाठी व्हिडिओ अल्बम हे एक सोपं गणित झालं आहे म्हणून, की जगण्यासाठी लागणारा पैसा खूप कमी पडतो म्हणून हे तरुण 'असले' व्हिडिओ अल्बम करतात? हा सात्त्विक संताप नाही. हीटींग बीलो द बेल्ट सदरातले आहे, मी ह्याच्या वर प्रतिक्रिया देणार नाही.

जी गोष्ट मुलांची तिच मुलींची. ज्या गाण्यावर अरूणा इराणीची थिरकती अदा पाहायला मिळते त्याच गाण्याच्या रिमिक्सवर एक मुलगी आपल्या प्रियकराला उद्दीपित करताना दिसते. आपण तानसेन पासून सुरुवात करून अरूणा इराणी ची पाठराखण करीत आहात, किती हे वैचारिक दारिद्र्य... आपण हेमामालिनीचा स्टेज शो पहा, थिरकती अदा कशाला म्हणतात ते कळेल. अरूणा इराणीची अदा थिरकती नाही थिल्लर जरुर आहे. 

'सजना है मुझे सजना के लिए' या गाण्याच्या अर्थाशी दूरान्वयेही संबंध नसलेले चित्रण केले जाते आणि त्यात प्रियकरच आपल्या प्रेयसीला साडी नेसवताना दाखवला जातो. 'काटा लगा' असे 'रेकत' ब्लाऊज वर उचलणारी मुलगी कोणत्या मानसिकतेचे प्रतिनिधित्व करते? आपणाशी सहमत..... 

मुळात, कला ही गोष्ट आपल्याकडे नाही हे सत्य स्वीकारण्यापेक्षा तिला अशा प्रकारच्या व्हिडिओचा मुलाजमा चढवून, स्वतःला संगीतकार म्हणवण्याचा अट्टहास का? यातून काय साध्य होणार? ह्या मुला मुलींना टीकेची नाही मार्गदर्शकाची गरज आहे, घेताय चॅलेंज?

रिमिक्स आवडणारा रसिकवर्ग ही आहे. पण त्यामध्ये वावरणाऱ्या रसिकांमध्ये अर्धवट वयातील मुलांचा जास्ती समावेश आहे. नुकतीच पौगंडावस्थेत आलेली मुले, ज्यांची सारासार विचार करण्याची क्षमता नसते, जी असे रिमिक्स अल्बम बघतात त्यांच्या मनावर नक्कीच परिणाम होत असेल. जे समोर दिसते तेच सत्य असे समजून चालणाऱ्या तरुणाला आपली एखादी वर्ग मैत्रीण, बहीण यांच्यामध्येही तिच मॉडेल नाही दिसणार का?  हा विचार करायला नको का? हा गहन विषय आहे, ह्याला मल्टी डायमेंशनस आहेत, ह्या विषयाची व्याप्ती संस्कारक्षम मने ह्या नवीन सदरात मी सुरू करणार आहे, सध्या मराठी कळफलका वर प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्नात मी आहे.

रिमिक्स गाणी विकत कोणी घेणार नाही म्हणून 'असले' व्हिडिओ अल्बम काढून, त्या व्हिडिओसाठी तरी आपली गाणी विकली जातील, ही मानसिकता बदलायला हवी, नाहीतर, सरकारने असल्या अल्बम च्या निर्मितीवरच बंदी घालायला हवी. जगाचा तुरंग होईल, लोकशाहीचे खुलेपण वैचारिक स्वातंत्र्य नको का? स्वतःचे स्वतः ठरवा.

'विद्वान सर्वत्र पूज्यते' या नियमाप्रमाणे खरंच जर तुमच्यात कला असेल तर 'अशा' व्हिडिओशिवाय ही तुमची गाणी लोकप्रिय होतील आणि झालेलीही आहेत. चिक्कार उदाहरणे देता येतील. उस्ताद सुलतान खान आणि चित्रा यांनी गायिलेले 'पिया बसंती रे' हे गीत एका सुंदर रचनेचा नमुना आहे. सहमत....

संपूर्ण जगात भारतीय संगीताला श्रेष्ठत्व दिले गेले आहे. ते जपण्यासाठी कोणीही परदेशी लोकं नाही येणार, ते आपल्यालाच जपायला हवे. अगदीच कूपमंडूक आणि 'माकड काय म्हणते; माझाच पाठमोरा भाग लाल' असा विचारा आहे हा, मी कामा निमित्त बरेच देश बघितलेत, बहुराष्ट्रीय कंपनीत वेगळ्या वेगळ्या देशांच्या नागरीकांच्या (गोरे, काळे, गव्हाळ, पीत) संपर्कात कधी साहेब तर कधी सहकारी म्हणून काम केले आहे, सध्या करत आहे. जसे मला आपली कला आणि संस्कृती प्यारी तशीच त्यांना त्यांची प्यारी आहे. जसा मी सहिष्णू होऊन त्यांच्या कला आणि संस्कृतीचा आदर करतो, तसाच ते आपल्या कला आणि संस्कृतीचा आदर करतात. तुमची कला आणि संस्कृती आमच्या पेक्षा श्रेष्ठ आहे असे कोणीही म्हणत आही. माझी तशी अपेक्षा पण नाही.  

संगीताच्या नावाखाली ओरडत, रेकत अंगविक्षेप करत स्वतःला कलाकार म्हणवण्यापेक्षा जे खरोखरचं संगीत निर्मिती करत आहेत त्यांना ऐकणं ही सुद्धा एकप्रकारे संगीताची पूजाच आहे. गरज आहे फक्त आपली क्षमता ओळखण्याची आणि सत्य स्वीकारण्याची. सहमत....

आपला लेख मी प्रतिकात्मक घेऊन बांधनीय टीका (कंन्स्ट्रकटीव्ह क्रीटीसीझम) करण्याचा प्रयत्न केला आहे, काहीही वैयक्तिक नाही. क्षमस्व.

- राज धर्माधिकारी.