रिमिक्स वाल्यांना एकमेव ठेका डोळ्यापुढे असावा - रुपयाची छन छन. बाकी कोणत्याही गोष्टीचे त्यांना सोयर सुतक नसावे. काय खपेल? बस्स, ते द्यायचे, अधिकाधीक आकर्षक वेष्टनात द्यायचे आणि चलती आहे तोपर्यंत कमावायचे हे सरळ गणित आहे. बाकी वाजणाऱ्या गाण्याचे बोल, संगीत व दृश्यातले नाच याचा संबंध असावाच असे काही नाही. छोड दो आंचल चा नवा अवतार पहिल्यांदा ऐकला/ पाहिला तेव्हा मला हसू आवरेना. आंचल म्हणजे पदर. ज्या मुलीच्या अंगावर जेमतेम कपडे आहेत, तीने या गाण्यावर नाच करताना पाहून हसू आवरेना.
साधारण कुठलेही गाणे उद्धारले तरी नाचणाऱ्या, त्यांचे कपडे व हावभाव हे साधारण सारखेच असतात. याला म्हणतात सुलभता! कुठल्याही गाण्याचे बोल व इतर कुठल्या गाण्याचे दृश्य जर एकत्रित करुन दाखवले तरी काही फरक पडत नाही. कलाकार तर अशा 'अल्बम' मध्ये काम करायला एका पायावर तयार असतात. त्याचे कारण असे की एकदा 'गरमा गरम' असे नाव झाले की पुढे धडाधड कार्यक्रमांची बोलावणी मिळतात व रग्गड पैसा मिळवता येतो. काटा वाल्या शेफालीने स्वत: एका चित्र-प्रकाशनाला दिलेल्या मुलाखतीत असे सांगितले होते की त्या अल्बमचे तीला केवळ पंधरा हजार मिळाले पण त्यामुळे तिला जी प्रसिद्धी मिळाली त्यामुळे तीला नंतर प्रत्यक्ष कार्यक्रमासाठी एका प्रयोगाचे पन्नास हजार ते एक लाख रुपयांचे देकार आले.
जसे शीत पेय/ चटपटीत खाद्यपदार्थ बाजारात आणणारे लहान मुलांना आपले लक्ष्य बनवित आहेत तसे रिमिक्स वाले सुमार गाण्यांना उत्तान नाचात बांधून तरुण पिढीला लक्ष्य करीत आहेत.
कदाचित सुंदर, सुरेल, चिरंतन ही कल्पना बदलुन तत्क्षणी रिझवणारे व घटकाभर जीव रमवणारे अंगिकारण्याची नवी मानसिकता या मागे हेरली गेली असावी.