उत्तम चर्चा, आणखी सहभाग हवा.
- या चर्चेची एक अंतिम तारीख ठरवून घ्यावी. १५ जुलै. १६ जुलैनंतर त्वरेनं चित्त आणि इतर काही मंडळीनी (मुद्दा क्र. ३ पहा) दोन्ही अंकाचं स्वरूप निश्चीत करून ते इथं मांडावं. अंकात काय असेल, ते साहित्य पाठवण्याची अंतिम तारीख, शब्दमर्यादा, संपादनाची जबाबदारी कोणी घेतली आहे असे मुद्दे असणारं हे निवेदन असावं.
- प्रशासकांनी १५ जुलैपर्यंत दोन्ही अंकांबाबत निर्णय करावा. त्यांनी सकारात्मक निर्णयच करावा, ही आग्रहाची विनंती. हे दोन्ही अंक मुक्तसहभागी अंक होतील. तसा प्रयोग कदाचित पहिलाच ठरेल. कोणतीही औपचारीक यंत्रणा, संघटना, कोणताही व्यावसायीक किंवा हितसंबंधी हेतू नसताना निघणारे अंक! हे `मनोगत'च्या उद्देशाला साजेसंच असेल. अखेर, `या अंकात व्यक्त झालेल्या मताशी संपादक सहमत असतीलच असे नाही' हे अनेक प्रकाशनांचं बोधवाक्य इथंही कामी येईलच. फक्त त्यात `संपादक'ऐवजी `प्रशासक' करायचं. हे मी गांभीर्यानं लिहितोय, कारण केवळ मतभिन्नतेपायी या चांगल्या कल्पनेच बोऱ्या वाजू नये अशी इच्छा आहे.
- संपादक कोण, अशी चर्चा काय कामाची? इथं समविचारी (विचार एकच, हे अंक साकारायचेच) मंडळींनी एकत्र येऊन काही शिस्ती ठरवून घेतल्या की झालं. शेवटी हा `थँकलेस जॉब' (मराठी प्रतिशब्द?) आहे हे सदस्य समजून घेतील अशी आशा मला आहे. (इथं घडलेल्या काही गोष्टी माहित असूनही हे लिहितोय कारण मी चिरंतन आशावादी आहे).
- अंकांच्या आकाराविषयी आधी सुवर्णमयी आणि मग चित्त यांनी मांडलेल्या कल्पनांशी सहमत. फक्त त्यात नेमकेपणाने विनोदी साहित्याचा उल्लेख नाही. त्या-त्या क्षेत्राच्या संपादकानं कटाक्षानं तशाही साहित्याची निवड केली की हा विषय निकालात निघेल.
- `निवडक मनोगत' अंकाविषयी सन्जोप राव यांनी मांडलेल्या मतदानाच्या कल्पनेशी सहमत आहे. फक्त त्यात तो-तो चर्चा प्रस्ताव मांडणारा आपोआप संपादक ठरू शकतो. माझी त्याला हरकत नाही. अपेक्षा आहे. त्यानं/तिनं संपादकाच्याच भूमिकेत शिरलं पाहिजे. त्याचा/तिचा विचार साकल्याचाच असावा. ही बाब प्रामुख्यानं विचारांच्या संदर्भात लागू होते. उदा.: संपादक असणारी `क्ष' ही व्यक्ती हिंदुत्ववादी नाही म्हणून तिनं त्या विचारांच्या संबंधीत विषयावरील साहित्य नाकारलं असं होता कामा नये. हीच बाब साहित्याच्या संबंधातील विचारांनाही लागू होते. साहित्यासंबंधात स्विकृत चौकटींचा विचार करून साहित्य निवडणं, मग त्यातून `समजणं, बांधणीच्या दृष्टीनं (यात भाषाही आली) जमलेलं असणं आणि शेवटी पटणं' या क्रमानं निवड होऊ शकते. पहिला निकष पूर्ण होणं हेही पुरेसं आहे, पहिल्या दोन्ही निकषांची पूर्तता होत असेल तर उत्तमच. तिन्ही असतील तर बहारच. पण केवळ तिसरा निकष पूर्ण होत नाही म्हणून साहित्य नाकारणं असं होऊ नये (इथं कृपया कोणीही सापेक्षतेचा सिद्धांत आणू नये ही विनंती. कारण मग ही चर्चा अनंत काळापर्यंत चालू राहू शकते आणि मला त्यात रस नाही. मला रस आहे तो या अंकांमध्ये).
- सन्जोप यांच्या प्रस्तावात प्रत्येक प्रकारात किती साहित्य सुचवावं याचा उल्लेख नाही. माझ्या मते ती संख्या तीन असावी (म्हणजे तीन लेख, तीन कविता, तीन कथा वगैरे). तीनच अशासाठी की आपोआप एक चाळणी लागेल. आणि सदस्यांनाही बारकाईनं आणि जबाबदारीनं निवड करावी लागेल. प्रत्येक साहित्याच्या दुवा त्या-त्या चर्चाप्रस्तावावरील प्रतिसादात सदस्यानं द्यावा, म्हणजे संपादकाचं काम सोपं होईल. (व्यक्तिशः मला हे दुवा देणं शिकून घ्यावं लागणार आहे).
- या विषयावरील सर्व चर्चा (आस्वाद, विवाद, संवाद - अगदी याच क्रमानं), आत्ता होते आहे तशी, इथंच व्हावी. आपोआप पारदर्शकता राहील आणि बरेच मुद्दे निकालात निघतील.
बोला मी काय करु? सन्जोप यांनी सुचवल्याप्रमाणे उत्तम वैचारीक लेखांसाठी एक प्रस्ताव टाकतो आहे. अंक न निघाल्यास, सदस्यांच्या आवडीवर आधारित माझी निवड, म्हणून इथंच दुव्यांसह संकलीत करून टाकेन म्हणतो. काय वाटतं?