मनोगत हे मुक्तांगण आहेच आणि ते तसेच रहावे ही माझीही इच्छा आहे, पण हे चालले आहे ते एक (किंवा दोन) विशेषांक काढण्यासाठी. एक दिवाळी विशेषांक की ज्यात सगळे नवे साहित्य असेल आणि एक 'मनोगर विशेष' की ज्यात आजवर 'मनोगत' वर प्रसिद्ध झालेले निवडक साहित्य असेल. हे निवडक साहित्य प्रातिनिधिक किंवा सर्वसंमतीने श्रेष्ठ असेल असा दावा करणे कठीण आहे, हे मान्य. म्हणून तर हा लोकशाही पद्धतीने निवड करण्याचा प्रयत्न. 'मनोगती' लेखक वाचकांच्या सुजाणपणावर आणि प्रगल्भतेवर (कदाचित थोडासा भाबडा) विश्वास ठेवून हा उपक्रम मांडला आहे. यात छक्केपंजे, गटबाजी वगैरे काही येणार नाही, अशी आशा आहे.
मराठी वाचकाला आंतरजालावर प्रसिद्ध होणाऱ्या अशा साहित्याचा परिचय करुन देणे आवश्यक आहे. अशी संकेतस्थळे आहेत, त्यावर असे असे लिहिले जाते हे जितक्या मराठी लोकांना कळेल तितके बरे. 'मनोगत विशेष' आणि 'मनोगत'चा दिवाळी अंक पीडीएफ स्वरुपात किंवा तबकडीच्या रुपाने आपण आपल्या परिचित लोकांपर्यंत पोचवून येत्या दिवाळीच्या निमित्ताने एक नवीन पायंडा पाडण्याचा प्रयत्न करुयात. हे जर जमले तर प्रत्येक वर्षी 'या वर्षात मनोगत वर प्रसिद्ध झालेले निवडक साहित्य' असा एखादा अंक प्रसिद्ध करण्याचा विचार करता येईल. ('अक्षर दिवाळी' च्या धर्तीवर) अर्थात या फारच पुढच्या गोष्टी झाल्या!