माझ्या बाबांची नोकरीनिमित्त्याने बदली होत असे. त्यामुळे विदर्भ मराठवाडा आणि खानदेश आणि पुणे या भागातील मराठी मी  मला जवळून बघितली आहे.  आमचे नातेवाईक महाराष्ट्रात पुणे मुंबई व्यतिरिक्त इतर भागातही होते.  सुटीत त्यांच्याकडे गेले की बाजारहाट करताना काही अनुभव येत. जिल्हास्तरीय व विभागीय स्पर्धांमध्ये शाळेचे प्रतिनिधित्व करतांना मला महाराष्ट्रातील वेगवेगळी गावे बघण्याची संधी मिळाली. तेव्हा आणि नंतरही माझ्या लक्षात आले की  मराठी मातृभाषा नसणारे अनेक जण मारवाडी, सिंधी,गुजराथी, कन्नड, तेलगू, पारसी  मुंबईबाहेरही अनेक शहरात, गावात रोजगाराच्या शोधात महाराष्ट्रात आले  आणि जिथे व्यवसायात जम बसला , तिथेच  ते स्थायिक झाले.  ही सर्व मंडळी (सरासरी ८०%हून अधिकजण  तरी) स्थानिक मराठीत व्यवहार तेवढाच सफाईने करत.   गिऱ्हाईकाचा खिसा रिकामा करायचा तर आधी त्याच्या भाषेत आणि गोड बोलले पाहिजे हे नमके तंत्र त्यांनी जाणले होते. घरकाम करणाऱ्या बायका, मजूरी करणारे कामगार, बोहारी, सुतार , सोनार असे विविध लोक वेगळी मातृभाषा असून मराठीत व्यवहार करत याचा प्रत्यय मला आलेला आहे.  त्यावेळी शाळेत असणाऱ्या इतर धर्मीय व वेगळी मातृभाषा असणाऱ्या मुलांना मराठी न अडखळता बोलता येत असे हा माझा अनुभव आहे.

विदर्भात किंवा खानदेशात सर्व व्यवहार हिंदीत होतो किंवा हिंदीच बोलतात हा  निव्वळ गैरसमज आहे. संवादासाठी समान भाषा हवी ही गरज आहे त्यामुळे हिंदीचा वापर होतो हे नाकारणार नाही. पण या भागातील मराठीवर तेथील शेतीसारख्या व्यवसायाचा आणि ते करणाऱ्यांच्या बोलीभाषेचा(मराठीच) प्रभाव अधिक आहे. तेच इतर भागातही आहे. पण आता बंबैया हिंदीने सर्वांनाच आणि नंतर शहरी माणसाला इंग्रजीने पछाडले आहे हे वस्तुस्थिती आहे.

आता राहिले बीएम एम आणि देणगी प्रकरण....
बीएमएम ने देणगी स्वीकारावी ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे..यावर एकाही अमेरीकेतील मराठी माणसाचे दुमत नसावे.  पण मग असे का झाले हा प्रश्न अनुत्तरीत राहतो.
 सिऍटल अधिवेशनाला आलेला प्रत्येक जण अंदाजे २०० डॉलर एवढी फक्त फी आणि जेवणाचे १०० डॉ देऊन गेले होते. असे अडीचहजार जण होते. (विमानभाडे आणि राहण्याचा खर्च वेगळाच) सिऍटलचे बजेट एक मिलिएन डॉ होते अशी बातमी आहे. झाकिर सारखे कलाकार अशा खास कार्यक्रमाचे अंदाजे  ६०००० डॉ घेतात . इतर मोठी मंडळी (सुधीर गाडगीळांसकट)  उगीच आपले तोंड उघडत नाहीत... असो. .अशा पार्श्वभूमीवर झालेला प्रकार खेदजनक आहे.