सोमरावांनी जे लिहिले आहे त्यावरून "जे झाले ते झाले, आता पुन्हा कशाला तेच ते उगळू नका', असे त्यांना सुचवायचे आहे, असे दिसते. दोन हजार वर्षांपुर्वी बनवलेले नियम आजच्या परिस्थितीनुसार अनुकरणीय नाही, असे तेच म्हणताहेत. तरीही त्यांना मनु महाराजांवर टीका नको आहे. अर्थात, त्यांना कितीही नको असले तरी मनुस्मृतीची चिकित्सा करताना, टीका ही होणारच याचा त्यांना विसर पडलेला दिसतो.
कधी काळी कोणी तरी तत्कालिन परिस्थितीत काही तरी नियम बनवायचे. (तेव्हा ते योग्य असतीलही) अन् सर्वात प्रगत संस्कृती म्हणवून घेणाऱ्या पाईकांनी दोन हजार वर्षांनंतरही त्याची चिकित्साही करू नये, हे योग्य नाही. असे नियम योग्य की अयोग्य, हे ठरवताना अशी चिकित्सा उपयुक्त ठरते. अयोग्य असेल, तर चिकित्सेचे स्वरूप टीकात्मक असते. साहजिकच टीकेचा रोख त्या नियमांच्या निर्मिकाकडेच असतो. मनुस्मृतीत द्विज (ब्राह्मण) आणि अंत्यजांसाठीचे (शूद्र) नियम इतके परस्पर विरोधी, एका समूहाला बेछूट वागण्याची सवलत देणारे आणि एका समुहाचे भवितव्यच जनावरांपेक्षा हीन ठरविणारे होते, आहेत. त्यामुळे असले नियम नाकारताना "मनु'वर टीका होणे अपरिहार्य आहे.
सोमरावांच्या "जाऊ द्या' या मुद्द्याचे समर्थन करायचे झाल्यास जालियनवाला बाग हत्याकांडाला ब्रिटीश मानसिकतेची विकृती तरी का संबोधावे किंवा देवी-देवतांच्या मुर्तींचे भंजन करणाऱ्या इस्लामच्या पाईकांना आक्रमक तरी का म्हणावे. त्यांनीही त्यांच्या अस्तित्वासाठी, पुढे जाण्यासाठी बनवलेल्या नियमांचेच पालन करत हे कृत्य केले. तेव्हा त्यांच्यावर टीका करण्याचा आपल्याला अधिकारच राहत नाही. खरे तर चिकित्सा करताना केलेल्या कृत्याबरोबरच ते का केले याचा कार्यकारण भाव शोधला जातो. त्यातूनच ते करणाऱ्यांच्या मानसिकतेचा अंदाज येत असतो. त्यामुळे मनुस्मृतीबाबत या नियमांमागचा कार्यकारण भाव शोधताना, विशिष्ट समुहाचे इतरांवर नियंत्रण राहावे आणि इतरांनी या नियंत्रणाचा फारसा विचार करू नये यासाठी त्यांच्यावर धार्मिक- बौद्धिक बंधन घालण्याचे काम त्यातून झाल्याचे दिसून येते. म्हणूनच प्रत्येकवेळेस भारतीय समाजात जातीच्या मुद्द्याची चर्चा होणार तेव्हा सर्वप्रथम नाव येईल ते मनुचे. टीकाही त्यांच्यावर होईल. "जुने जाऊ द्या मरणालागूनी' म्हणत आपणही जुन्यातील नव्या संदर्भांचा शोध घेतल्यास, कोण्या पुराणपुरुषावरील टीकेने अस्वस्थ होण्याची वेळ आपल्यावर येणार नाही.
माझ्या या लिखाणामागचा उद्देश वाद घालण्याचा नाही, तर चिकित्सा व्हावी आणि वाईट गोष्टी त्याज्य ठरवून चांगल्या गोष्टी समोर याव्यात, यासाठी आहे.