कथा चांगली झाली आहे.

पण, समस्येच्या भावनिक विवेचनात अपयश आले आहे असे वाटते.

सहाच महिन्यांच्या समाधानी संसारातून एकाएकी 'मन' उडून जुन्या पण नव्याने भेटलेल्या मैत्रिणीकडे धावावे हे अनाकलनीय वाटते. म्हणजे मुळात 'सायली'शी विवाह हा मनापासून होता की नाही ही शंका येते. अतिशय नगण्य टक्केवारीत पुरूष असे वागत असावेत. इतक्या पराकोटीचा बेजबाबदारपणा 'अद्वैतच्या' व्यक्तिमत्त्वाला फारच उथळपणा आणतो आहे. 'अद्वैत' नांव धारण करणाऱ्या व्यक्तीच्या मनात स्वतःच्या पत्नीबाबत इतके 'द्वैत' असावे हा दैवदुर्विलास आहे असे म्हणून सोडून द्यावे काय?

'नेहा' स्वतः दु:खी आहे. तिला विस्कटलेल्या संसाराचे 'दु:ख' हे किती व कसे जाळते ह्याचा अनुभव आहे (असे वाटते). तरीपण ती 'सायली'च्या आयुष्यात दु:खाची जाळपोळ करण्यास आणि त्यांचा संसार उध्वस्त करण्यास उद्युक्त होते, ह्यावरून तिच्या व्यक्तिमत्त्वातही उथळपणा कसा भरभरून वाहतो आहे, हेच जाणवते. भावनिक कोरडेपणाच्या ह्या कथेत शरीरसंबंधालाच 'प्रेम' मानलेले दिसून येते आहे हे पुढील वाक्यांमधूनही जाणवते.
जर तुझ्या मनात तीच होती, तर माझ्यासोबत जगलेल्या रात्रींचं काय? ....दिवसा ऑफिसमध्ये नेहा, आणि रात्री सायली...

सुरूवातीचे तपशील अद्वैतच्या नेहाबद्दलच्या भावनांची तीव्रता दर्शवण्यासाठी गरजेचे आहेत असं मला वाटलं.

चुकीचे आहे ते. 'त्या' तपशिलातील वर्णन, 'शारीरिक आणि अनैसर्गिक' आहे. त्यात, भावनांची तीव्रता दिसून न येता शारीरिक अतृप्त तहान प्रकर्षाने जाणवते आहे.

कथेचा शेवट कसा करावा ह्याचे स्वातंत्र्य लेखकाला जरूर आहे. पण लेखकाने अद्वैतची बाजू कमकुवत आणि सायलीची बाजू मजबूत बांधली आहे. अद्वैतचे विचार उथळ वाटावेत आणि सायलीला वाचकाची सहानुभूती मिळावी अशी कथेची मांडणी लेखकाने जाणूनबुजून केली आहे. त्यातून त्याने स्वतःचे मत मांडले आहेच पण वाचकांचा कल ही हेतुपुरस्सरपणे 'त्या' शेवटाप्रत वळविला आहे. असे असताना 'तसा' शेवट न देता अर्धवट अवस्थेत (शेवट) सोडून देऊन लेखकाने काय साधले आहे कळत नाही.

पण तरीही, कथा चांगली आहे. त्यातील मुद्द्यांचा, कथावस्तूचा, भावनांचा विस्ताराने विचार व्हायला हवा होता. तसे झाले असते तर कथेच्या सौंदर्यात भर पडली असती.

अभिनंदन.