सहाच महिन्यांच्या समाधानी संसारातून एकाएकी 'मन' उडून जुन्या पण नव्याने भेटलेल्या मैत्रिणीकडे धावावे हे अनाकलनीय वाटते. म्हणजे मुळात 'सायली'शी विवाह हा मनापासून होता की नाही ही शंका येते. अतिशय नगण्य टक्केवारीत पुरूष असे वागत असावेत. इतक्या पराकोटीचा बेजबाबदारपणा 'अद्वैतच्या' व्यक्तिमत्त्वाला फारच उथळपणा आणतो आहे. 'अद्वैत' नांव धारण करणाऱ्या व्यक्तीच्या मनात स्वतःच्या पत्नीबाबत इतके 'द्वैत' असावे हा दैवदुर्विलास आहे असे म्हणून सोडून द्यावे काय?

मान्य. अद्वैतबद्दल हेच आक्षेप कथेच्या अजून काही वाचकांनी सुद्धा नोंदवले आहेत. माझ्या मनात अद्वैत आणि त्याच्या कृतींमागची 'त्याची' कारणं कायमच स्पष्ट होती. जर हे वाचकांना स्पष्ट होत नसेल, तर ते माझं अपयश म्हणायला हवं.

तिला विस्कटलेल्या संसाराचे 'दु:ख' हे किती व कसे जाळते ह्याचा अनुभव आहे.

तिच्या आणि सायलीच्या दुःखाची कारणं, जातकुळी वेगळी आहे. तिला हवा आहे तो आधार, पोळून आल्यानंतर. ती 'उथळ' आहे का? की तिनं (थोडंफार अद्वैतसारखंच) स्वतःला काय मिळतंय हे पाहताना बाकी गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आहे? अर्थात, नेहाचे 'मोटिव्ह' जर तुम्हाला दिसत नसतील, तर ते ही माझं अपयशच आहे.

भावनिक कोरडेपणाच्या ह्या कथेत शरीरसंबंधालाच 'प्रेम' मानलेले दिसून येते आहे हे पुढील वाक्यांमधूनही जाणवते.....त्यात, भावनांची तीव्रता दिसून न येता शारीरिक अतृप्त तहान प्रकर्षाने जाणवते आहे.

अं.....शरीर हे मनाचं 'मिडियम ऑफ एक्सप्रेशन' असं काहीसं मला वाटतं. शारीर कृती ही एकटी, 'आयसोलेटेड' नसते, तिच्याकडे मनाच्या संदर्भांशिवाय पाहूही नये. म्हणूनच मला वीर्यपात शारीरिक अतृप्त तहान नाही, तर त्याच्या भावनांची तीव्रता दाखवणारा वाटतो. म्हणूनच माझी सायली 'निर्णय' घेते, ते तिला आपल्या नवऱ्यात आणि त्याच्या मैत्रिणीत जे घडलंय ते कळल्यावर. नवऱ्याचं मन कुणीकडे चाललंय ते तिला कळलेलं असतं, पण जेव्हा नवरा स्वतःहून ती शारीर कृती करतो, तेव्हा त्यानं सीमारेषा ओलांडल्या आहेत अशी सायलीची धारणा होते. ह्या दोन्ही गोष्टींमागचे, आणि सायलीच्या ''जर तुझ्या मनात तीच होती, तर माझ्यासोबत जगलेल्या रात्रींचं काय? ....दिवसा ऑफिसमध्ये नेहा, आणि रात्री सायली...' ह्या वाक्यांमागचेही माझे विचार वर दिल्याप्रमाणे आहेत. मनात तर लाख काही काही असतं, पण जेव्हा माणूस 'कृती' करतो, तेव्हा तो त्याच्याच मनातल्या अमूर्त कशालातली प्रत्यक्षात आणत असतो.

मन आणि शरीराच्या परस्परसंबंधांकडे असं पाहताना मला ह्या कथेत भावनिक कोरडेपणा आणि शरीराला उगाच महत्त्व दिलेलं दिसत नाही. 

असे असताना 'तसा' शेवट न देता अर्धवट अवस्थेत (शेवट) सोडून देऊन लेखकाने काय साधले आहे कळत नाही.

अद्वैत उथळ वाटतो, त्याची बाजू नक्कीच कमकूवत आहे. पण म्हणून तो एकदम बदलून जाईल असं दाखवणं मला चुकीचं वाटलं. तो फक्त विचार करीन असं म्हणतो, म्हणून सायली निघून जाते.
(जे काही सायली तिथं बोलली आहे, ते तिनं आचरणातही आणलं आहे.)

असो. कथा मी वर एका प्रतिसादात लिहिल्याप्रमाणं माझे लग्नविषयक फंडे द्यायला लिहिली होती. आता असं वाटतंय की मी कथेकडे माझं 'माध्यम' म्हणून न बघता कथेचा 'कथा' म्हणून अजून जास्त विचार करायला हवा होता. पुढच्या वेळी लिहिताना हे नक्की ध्यानात ठेवीन.

धन्यवाद!!