या कथेस प्रभाकर पेठकरांनी दिलेल्या प्रतिसाद-उपप्रतिसादांवरून असे वाटते की ते कळत-नकळत आपल्या नैतिकतेच्या कल्पना कथेतील पात्रांवर लादू पाहत आहेत, आपल्या नैतिक-सामाजिक चौकटीत त्यांना बसवू पाहत आहेत व ती त्यात बसत नाहीत असे दिसल्यावर नाराज होत आहेत. कथेचा आस्वाद घेण्याची वा समीक्षेची ही पद्धत मला तरी पटत नाही. आपण वाचत असलेल्या साहित्यातील साऱ्या पात्रांनी आपल्याला योग्य वाटेल तसेच वागणे अपेक्षित नसते. माणसा-माणसात फरक असायचाच. पेठकर ज्या नैतिकतेचा आग्रह धरतात ती समाजमान्य असली तरी सगळ्यांकडून सदा-सर्वदा खरोखरीच पाळली जाते का? माणसे (स्त्रिया व पुरुष दोन्ही) स्खलनशील असतात व यावच्चंद्रदिवाकरौ तशीच राहणार. जो शारीर मोह देवादिकांना व ऋषी-मुनींना चुकला नाही, आवरता आला नाही तो सामान्य माणसांना कधीही होणर नाही, त्यास ती कधीही बळी पडणार नाहीत हे अशक्य आहे.
इतक्या पराकोटीचा बेजबाबदारपणा 'अद्वैतच्या' व्यक्तिमत्त्वाला फारच उथळपणा आणतो आहे. 'अद्वैत' नांव धारण करणाऱ्या व्यक्तीच्या मनात स्वतःच्या पत्नीबाबत इतके 'द्वैत' असावे हा दैवदुर्विलास आहे असे म्हणून सोडून द्यावे काय?
'नेहा' स्वतः दु:खी आहे. तिला विस्कटलेल्या संसाराचे 'दु:ख' हे किती व कसे जाळते ह्याचा अनुभव आहे (असे वाटते). तरीपण ती 'सायली'च्या आयुष्यात दु:खाची जाळपोळ करण्यास आणि त्यांचा संसार उध्वस्त करण्यास उद्युक्त होते, ह्यावरून तिच्या व्यक्तिमत्त्वातही उथळपणा कसा भरभरून वाहतो आहे, हेच जाणवते. भावनिक कोरडेपणाच्या ह्या कथेत शरीरसंबंधालाच 'प्रेम' मानलेले दिसून येते आहे हे पुढील वाक्यांमधूनही जाणवते.
'त्या' तपशिलातील वर्णन, 'शारीरिक आणि अनैसर्गिक' आहे.
सायलीने असे म्हणायला हवे होते 'तुझ्या मनात तीच होती तर माझ्या आयुष्यात का आलास? (रात्रीचा संदर्भ नको). ऑफिसमध्ये नेहा आणि घरी सायली...(रात्रीचा संदर्भ नको).'
रात्रीचा संदर्भ का नको? एक अपमानित, चिडलेली पत्नी आपल्या पतीशी त्याच्या व्यभिचाराविषयी एकांतात बोलते आहे हे लक्षात घ्या. तसेच या वाक्यात लेखकाने अश्लीलता आणलेली नाही वा पातळी सोडली नाही.
नाहीतर सलमान खान, विवेक ऑबेरॉय इत्यादींनी हाताळल्यावर अभिषेकने ऐश्वर्याशी लग्न का केले असते?
कथेच्या पात्राच्या तोंडी "...माझ्यासोबत जगलेल्या रात्रींचं काय? ....दिवसा ऑफिसमध्ये नेहा, आणि रात्री सायली...' हे वाक्य ज्यांना रुचत नाही ते पेठकर खऱ्याखुऱ्या ऐश्वर्याबद्दल "हाताळल्यावर" हा शब्द किती सहजपणे वापरून जातात. इथे ऐश्वर्याचा बचाव करण्याचा माझा उद्देश नाही (तिची ती समर्थ आहे!)
कथेचा शेवटी प्रश्न अनुत्तरित ठेवणे मला योग्य वाटले. ही काही लहान मुलांसाठी बोधकथा नाही. दरवेळी वाचकांना चमच्याने भरवण्याची काय गरज? जो तो विचार करून आपल्याला हवा तसा शेवट कल्पू शकतो. तसेच साऱ्याच प्रश्नांना सोपी उत्तरे नसतात.