श्री. मिलिंद फणसे,
या कथेस प्रभाकर पेठकरांनी दिलेल्या प्रतिसाद-उपप्रतिसादांवरून असे वाटते की ते कळत-नकळत आपल्या नैतिकतेच्या कल्पना कथेतील पात्रांवर लादू पाहत आहेत, आपल्या नैतिक-सामाजिक चौकटीत त्यांना बसवू पाहत आहेत व ती त्यात बसत नाहीत असे दिसल्यावर नाराज होत आहेत.
'आपल्या' म्हणजे माझ्या स्वतःच्या का? ह्या माझ्या स्वतःच्या कल्पना नसून, मला शिकविली गेलेली, समाजमान्य नीतिमूल्ये आहेत. ती मी कथेतील पात्रांवर लादू पाहत नसून लेखकाचे, अशा प्रसंगात, स्त्री किंवा पुरुषाच्या स्वाभाविक प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष झाले असून काही प्रसंग मनाला न पटणारे रंगविले गेले आहेत असे मत व्यक्त केले आहे. स्त्री-पुरुषांमध्ये अनैतिक संबंध कधी नसतातच असे मी कुठे म्हंटल्याचे मला स्मरत नाही. मी नाराज कशाला होऊ? रोजच्या वर्तमानपत्रांत अनैतिकतेच्या हजारो घटना वाचण्यात येतात त्यावर आपण घरात/मित्रपरिवारात चर्चा करीत नाही का? तसाच हा प्रयत्न आहे. 'मनोगता'वरील कथा वाचून तशाच दुर्लक्षाव्या असे तर आपले म्हणणे नाही नं?
कथेचा आस्वाद घेण्याची वा समीक्षेची ही पद्धत मला तरी पटत नाही.
मला वाटतं मी कथा मनापासून वाचतो आहे. त्यावर माझ्या बुद्धीला झेपेल असा 'विचार' करतो आहे. माझी भली-बुरी मतं मांडतो आहे. मला पटणाऱ्या दुसऱ्यांच्या विचारांना (प्रियाली ह्यांचा प्रतिसाद) स्वीकारतो आहे. कथेच्या चुकीच्या (मला वाटलेल्या) बाजूंवर आक्षेप घेताना चांगल्या (मला वाटलेल्या) बाजूंबद्दल लेखकाचे अभिनंदनही करतो आहे. कथेचा आस्वाद घेण्याची तसेच समीक्षेची माझी ही पद्धत मला योग्य आणि मनोगताच्या ध्येय-धोरणांमध्ये बसणारी वाटते.
जो शारीर मोह देवादिकांना व ऋषी-मुनींना चुकला नाही, आवरता आला नाही तो सामान्य माणसांना कधीही होणर नाही, त्यास ती कधीही बळी पडणार नाहीत हे अशक्य आहे
तसा माझा आग्रहही नाही. मोह सर्वांनाच होतात. त्यातून, समाजाने अनैतिक मानलेल्या घटनाही घडत असतात. त्यावर साधक-बाधक चर्चा झाल्याच पाहिजेत. वादे वादे जायते तत्त्वबोध: असे संस्कृत वचन आहे. (शब्द चुकले असल्यास, क्षमस्व)
ते अनैतिक असेल पण अनैसर्गिक कसे?
उलट अनैतिक नाही पण अनैसर्गिक जरूर वाटले. ज्या प्रसंगावर मी 'अनैसर्गिक' असे भाष्य केले आहे तो प्रसंग, अद्वैतला लग्नापूर्वीची मैत्रीण 'स्वप्नात' भेटते त्या प्रसंगाशी निगडित आहे. भेटीत अनैसर्गिक काहीच नाही. मला त्यात अनैतिकही काही वाटले नाही. त्या मैत्रिणीचा हात चुंबिल्यावर अद्वैतचा विर्यपात होतो. एक तासापूर्वी पत्नीशी 'रत' होवून निजलेल्या अद्वैतचा स्वप्नातील ह्या दृश्यावर विर्यपात व्हावा हे मला 'अनैसर्गिक' वाटते. अशा व्यक्ती प्रत्यक्षात अस्तित्वात असतीलही परंतु सर्वसामान्यपणे असे घडल्याचे माझ्या ऐकीवात नाही. एखाद्या 'असामान्य' पुरुषाच्या बाबतीत तसे घडूही शकेल.
कथेच्या पात्राच्या तोंडी "...माझ्यासोबत जगलेल्या रात्रींचं काय? ....दिवसा ऑफिसमध्ये नेहा, आणि रात्री सायली...' हे वाक्य ज्यांना रुचत नाही ते पेठकर खऱ्याखुऱ्या ऐश्वर्याबद्दल "हाताळल्यावर" हा शब्द किती सहजपणे वापरून जातात.
'हाताळलेल्या', 'वापरलेल्या', 'नासवलेल्या''मजा मारलेल्या' 'उपभोगिलेल्या' अशा, स्त्रीला अपमानित करणाऱ्या, अनेक शब्दांमधून मला 'हाताळलेल्या' हा शब्द जास्त सौम्य वाटला. कथेतील चुंबन दृश्याला आणि त्या नंतरच्या 'घटनेलाही' मी आक्षेप घेतलेला नाही. फक्त 'ती' घटना अनैसर्गिक वाटते असे म्हंटले आहे.
सायली जेंव्हा 'माझ्या सोबत जगलेल्या रात्रींचे काय? किंवा .........रात्री सायली' असे म्हणते (जे मला रुचले नाही) तिथे तिने फक्त 'रात्रीचा' विचार न करता 'आयुष्याचा' विचार करावा, ऑफिसमध्ये एक आणि घरी एक असा दोन सहचारिणींशी संसार करण्याला आक्षेप घ्यावा असे म्हणायचे आहे.लग्नाच्या बायकोवर जेव्हा असा पराकोटीचा प्रसंग येतो तेंव्हा ती आपल्या विस्कटलेल्या आयुष्याचा विचार करते. दुखावलेल्या प्रेमभावनांनी अपमानित होते. 'फुकट' गेलेल्या रात्रींचा हिशोब करीत नाही, असे मला वाटते.
कथेचा शेवटी प्रश्न अनुत्तरित ठेवणे मला योग्य वाटले.
कथेच्या शेवटी प्रश्न अनुत्तरित ठेवण्याला माझाही आक्षेप नाही. परंतु, लेखनाच्या तंत्राच्या दृष्टिकोनातून, समस्येशी निगडित दोन्ही (किंवा तिन्ही) व्यक्तींची बाजू समतोलपणे मांडून वाचकांना विचार करण्यास प्रवृत्त करणे हे अपेक्षित असते. पण एका पात्राची बाजू सशक्तपणे मांडायची आणि दुसऱ्याची बाजू कमकुवत मांडून वाचकांचा कल आपल्याला हव्या त्या निर्णयाप्रत आणून सोडायचा ह्याने काही विशेष साधले आहे असे मला वाटत नाही. तरी पण आपल्या कथेचा शेवट कसा करावा ह्याचे स्वातंत्र्य लेखकाला आहे हेही मी माझ्या प्रतिसादात दिलेले आहे.
ही काही लहान मुलांसाठी बोधकथा नाही.
खरंच की.... लक्षातच नाही आलं.