प्रभाकरपंत,
मला वाटते आपणास माझा मूलभूत मुद्दा एकतर कळला नसावा किंवा कळला असल्यास आपण त्यास बगल देत आहात. "समाजमान्य नीतिमूल्ये" हयातभर जपणाऱ्यांचेच चित्रण साहित्यात करावे काय? हे गृहीतक मान्य केल्यास सारे साहित्य हे साने गुरुजींच्या "गोड गोड गोष्टी" आणि " श्यामची आई " छाप होईल. (या दोन कलाकृतींना कमी लेखण्याचा उद्देश नाही पण जगात या पलीकडेही बरेच काही आहे हे विसरून चालत नाही). "स्वाभाविक प्रतिक्रियां" चे म्हणत असाल तर ज्यांना आपण वर्षानुवर्षे ओळखतो तेही वेळप्रसंगी कधी कधी असे वागतात की आपण अचंबित होतो. मानवी मनांची गुंतवळ समाजमान्य नीतिमूल्ये आणि स्वाभाविक प्रतिक्रिया यांच्या ढोबळ फणीने दर वेळी विंचरता येत नाही. माणसे चांगली असतात, वाईट असतात, भली असतात, विकृत असतात, मनाने खंबीर असतात, कमकुवत असतात. आयुष्यात हरघडी समोर येणाऱ्या प्रश्नांना , समस्यांना सगळेच आपणास अपेक्षित असलेली "स्वाभाविक प्रतिक्रिया" देत नाहीत. त्या माणसांच्या/पात्रांच्या प्रतिक्रिया, त्यांचे वागणे आपणास आपल्या conditioning मुळे, आपल्यावर झालेल्या उत्तम संस्कारांमुळे न रुचणे समजता येते पण जेव्हा त्यास आपण"न पटणारे" म्हणता तेव्हा (मी पहिल्या प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे) आपण आपले विचार त्या पात्रांवर लादत आहात हेच जाणवते. या कथेतील अद्वैत हा विवाहित असूनही लग्नानंतर सहा महिन्यात दुसऱ्या स्त्रीच्या प्रेमात पडतो, तिच्याशी विवाहबाह्य संबंध प्रस्थापित करतो. तो आपल्या सुखापुढे बाकी साऱ्या गोष्टी क:पदार्थ समजतो, तो नि:संशय स्वार्थी आहे, आत्मकेंद्रित आहे. पण तो असा आहे म्हणून ही कथा आहे! तो तसा नसता, तो एक प्रेमळ व निष्ठावान पती असता तर लेखकुंने काय गोष्ट लिहिली असती? "अद्वैत व सायली यांचा विवाह झाला व ते सुखाने नांदले" "And they lived happily ever after"! राहता राहिला प्रश्न "रात्री" व "हाताळणे" याचा तर भावनातिरेकात प्रक्षुब्ध झालेली माणसे शब्द तोलून-मापून वापरण्याच्या मनस्थितीत नसतात. जितक्या सहजतेने आपण "हाताळणे" हा शब्द वापरला आहे तितक्याच सहजतेने कथालेखकाचे  ते वाक्य आले आहे. मला तरी लेखकुंचे संवाद नैसर्गिक वाटतात. आणि हो, कथेवरील चर्चा वेगळी व सत्य घटनेवरील चर्चा वेगळी, नाही का?