रोहिणीताई,
ब्राऊन म्हणजे असडिक(न सडलेला) तांदूळ, याचाच अर्थ गिरणीमध्ये फक्त त्याचे वरचे आवरण काढले असे. त्यानंतर त्या तांदुळाला झिलई (पॉलिश) केली नसते. दुसरा प्रकार म्हणजे हातसडीचा तांदूळ, ज्यात मशीन ऐवजी हाताने सडण्याची क्रिया असल्याने, ते तांबूस कवच पूर्ण काढले नसते. [टीप: येथे "सडणे" ही भातावर केलेली यांत्रिक क्रिया आहे, नासणे या अर्थी असलेले "सडणे" हे अभिप्रेत नाही.]
तांबुस रंगाच्या आवरणात तांदुळातली मुख्य जीवनसत्वे विशेषतः "ब" असते. त्यामुळे असडिक तांदूळ जास्त शरीरपोषक असतो. त्याचा पुलाव जास्तच चांगला होईल. तो जास्त वेळ भिजत घाला. तो शिजवताना पाण्याचे प्रमाण जास्त ठेवा.
तांदूळ कोठल्या जातीचा आहे, आणि तो नवा किंवा जुना यावर त्यात किती पाणी घालायचे ते ठरविले जाते. थोडेफार प्रयोग करून ते नेमके कळून येईल. नव्या तांदुळात जात्याच पाण्याचा अंश जास्त असतो. तांदूळ जुना झाला की ते पाणी हवेत उडून जाऊन तांदूळ कोरडे होतात. भारतात साधारण आशिन, कार्तिकानंतर नवा तांदूळ बाजारत येतो. प्रत्यक्ष दुकानांत येऊन आपल्या चुलीवर केव्हा येईल हे सांगणे कठीण आहे. भारताबाहेर मिळणारा, भारतीय वा इतर आशियाई देशांतून आयात केलेला तांदूळ प्रत्यक्ष चुलीवर येईपर्यन्त त्यातले पाणी कमीच झाले असते.
असो यावरून आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल अशी आशा आहे. प्रभाकरपंत किंवा अनेक माहितगार मनोगती या.त भर घालू शकतील.
कलोअ,
सुभाष