गोट्यांमध्ये एक ढोपरीचा खेळ असतो.त्यात एक गल (जमिनीतला खड्डा) असतो.प्रत्येक खेळाडूने काही एका विशिष्ट अंतरावरून "चकायचे" असते. म्हणजे गोटी घरंगळवायची - गलीच्या दिशेने. ज्याची गोटी गलीच्या सर्वात जवळ पडेल त्याने ती प्रथम बंद पालथ्या मुठीने ढकलून गलीत ढकलायची.मग त्यापेक्षा दूर असलेल्या दुसऱ्याने, मग तिसरा... असे सर्वांनी करायचे.ज्याची गोटी गलीत जाईल तो सुटला. येथपर्यंत अगदी गावठी गोल्फच.
मग-जो शेवटी बाकी राहील त्याच्यावर राज्य.
त्याच्या गोटीला इतरांनी त्यांच्या गोट्यांनी टोलवायचे - टोलवत रहायचे - गलीपासून दूर- जितके शक्य असेल तितके.
त्याच्या गोटीला आपली गोटी थडकली की म्हणायचे -(एकदा आपटली की यातील एक म्हणायचे, अनुक्रमाने) -
एकलम खाजा, दुब्बी राजा, तीरान भोजे, चार चौकटी, पंचल पांडव, सय्या झेंडव, सात चौकटे, अष्टक नल्ले
नऊ नऊ किल्ले, दस्शी गुलाबा, अकल खराटा, बाळू मराठा, तेरलंगी सोटा - असे बरेच
असे म्हणत म्हणत त्याची गोटी खूप लांबपर्यंत टोलवायची - सर्वांचा नेम हुकेपर्यंत - कदाचित चांगली
एखादा किलोमिटरसुद्धा.
आणि सर्वांचा नेम चुकला की राज्य आलेल्या खेळाडूने आपल्या हाताने त्याच बाजूचा आपलाच कान पकडायचा - (करून पहा)- असे केले की आपले कोपर लटकू लागते.
मग त्याने खाली वाकून त्या लटकत्या कोपराने आपली गोटी जेथे असेल तेथून जमिनीवरून ढकलत परत गलीपर्यंत आणायची. असे करण्याला "ढोपरी काढणे" असे म्हणतात.
जितक्यांदा ढोपरावे तितक्यांदा कोपर जमिनीला घासते. (गोल्फ् सारखी हिरवळ नसते येथे)असे करता करता कोपरातून रक्त गळू लागते. अमानुष, क्रूर खेळ वाटतो का?
आयुष्य म्हणजे नियतीशी असाच एकलम खाजाचा खेळ. 'एकलम खाजा' च्या खेळात तुमच्यावर राज्य आलय . नियती तुमची गोटी टोलवतेय - लांब - लांब आणि तुम्ही "ढोपरी" काढताय. सतत ढोपरताय - आयुष्यभर.
गोट्या दोन प्रकारच्या असतात - एक - काचेच्या - रंगीबेरंगी. त्यात अनेक विचित्र आकार असतात. हवेचे बुडबुडे असतात.
दुसऱ्या - गारेच्या - सफेद पांढऱ्या.
माणूस दोन प्रकारे जीवन जगू शकतो- एक - वर्तमानाचे पूर्ण भान ठेवून
दोन - स्वप्नरंजनात दंग होऊन
स्वप्नरंजन हे क्षीण असते. कारण तो एक पळपुटेपणा असतो. स्वप्ने प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी.
सप्ने फुलासारखी पण तरीही बोचत रहाणारी. स्वप्ने माणसाला जोजवणारी - झोपवणारी.
स्वप्ने - पांढरी फक्त. त्यात तुमचे फक्त सुख असते.
या कवितेत कवीने माणसाचे डोळे (भावचक्षू) म्हणजे गोट्या आहेत अशी कल्पना केली आहे.'एकलम खाजा' या गोट्यांच्या क्रूर खेळाच्या प्रतिकाभोवती हे काव्यविश्व साकारते. स्वप्ने ही पांढरीफटक, निद्रिस्त, गुबगुबीत तरीही टोचणारी असून वास्तव हेच अत्यंत रंगतदार, कैफ आणणारे आणि जिवंत आहे असा दावा करण्याचा कवी प्रयत्न करतो. प्रत्यक्ष आयुष्यात माणसाने कसे जगावे? याबाबत प्रस्तुत कवीने आपला दॄष्टीकोन मांडण्याचा प्रयत्न केला आहे. स्वप्नरंजनापेक्षा वास्तवाला सामोरे जाऊन आपले आयुष्य जगले तर होणाऱ्या अपेक्षाभंगांमुळे आपले जीवन दु:खीकष्टी होणार नाही असे कवीचे मत आहे.
फक्त एका वाक्यात कवी हे सारं सांगतो म्हणून ती कविता. कवीच्या मनात निर्माण झालेल्या प्रतिमा काही लोकांना कळतात, काहींना नाही. पण म्हणून ते काव्य नाही असे कसे म्हणता येईल?
ही कविता बऱ्याच जणांना समजली नसावी असे वाटल्याने हा खुलासा करावा लागला. पुलस्ति यांचा कयास मूळ अर्थाच्या खूपच जवळ पोचला हे निश्चित.
कळावे लोभ असावा.
आपला,
दस नंबरी