कविता (खरे तर कोणत्याही प्रकारचे लेखन) दोनच प्रकारच्या - चांगल्या किंवा वाईट. कविता केवळ छंदात लिहिल्याने चांगली होत नाही व मुक्तछंदात लिहिल्याने वाईट ठरत नाही. तसेच फक्त मुक्तछंदातील ते काव्य व छंदबद्ध ती निव्वळ शाब्दिक कसरत ही भूमिकाही पटण्यासारखी नाही. दोन्ही गटात दर्जेदार, ताकदीच्या कविता आढळतात तशाच तद्दन टुकार रचनाही. मला वाटते, दर्जा सापेक्ष नसतो, व्यक्तिगत आवड-निवड सापेक्ष असते. मनोगत ओपन फोरम आहे, सर्व सदस्यांना आपले लेखन सादर करण्याची मुभा आहे. यावर आक्षेप घेतल्यास elitismचा (माफ करा, पटकन मराठी शब्द सुचला नाही) आरोप होईल.
जालावर काही काव्यफोरा असे आहेत जिथे गट पाडलेले असतात. उदा. इथे पाहा. गटांत टीका चढत्या भाजणीने अधिकाधिक निर्दय होत जाते. आपली कविता कोणत्या गटात टाकायची हे कवीने ठरवायचे मात्र पुढे होणाऱ्या चिरफाडीची मानसिक तयारी ठेवून! अगदी प्राथमिक गटातही निव्वळ "वा", "छान","आवडली" छाप प्रतिसाद नसतात. मनोगतावर अशी व्यवस्था केली तरी ती कितपत पसंत पडेल, स्वीकारली जाईल याबद्दल शंकाच आहे. तेव्हा येथील "जो जे वांछील तो ते लाहो" धोरण मान्य करून आपल्याला हवे ते वाचावे व इतर सोडून द्यावे. हजारो वर्षे जगातील सर्व भाषांमध्ये कविता केल्या जात असूनही आजतागायत 'कविता म्हणजे काय? कविता कशाला म्हणावे' या प्रश्नांना सर्वमान्य उत्तरे मिळू शकली नाहीत तर'चांगली कविता कोणती' ह्याचे निर्विवाद उत्तर कसे मिळणार?