ते किरकिरे, अशक्त, शेंबडे मूल अंगणात रांगत होते.
ते हसरे, गुटगुटीत, सतेज मूल अंगणात रांगत होते.
या दोन्ही वाक्यात - ते मूल अंगणात रांगत होते इतकेच सांगायचे आहे. पण मूल या शब्दाच्या विशेषणांमुळे वाचकाच्या मनात त्या मुलाची किती वेगळी चित्रे उभी रहातात. हेच तर या विशेषणांचे काम असते. उपमा, उत्प्रेक्षा, अपह्नुती आणि रूपक हे अलंकारही हेच कार्य करतात.
आधीचा विशेषणप्रचुर पण आकर्षक आणि अद्भूत भाग - लेखक/कवीला वाचकाच्या मनापर्यंत अशीच अद्भूत जाणीव हुबेहूब पोचवायचे असेल तर मग तो भाग उगाच कसा? नुसतेच गारेची गोटी आणि काचेची गोटी असे म्हटले तर त्यामागचे अंतस्थ अर्थ कसे पोचतील?
तरीही कवितेचा काही भाग कविवर्यांना आवडला असे दिसते. त्याबद्दल त्यांचे आभार.
पण असे 'प्रयोगशील' काव्यच मराठी कवितेच्या क्षेत्रात खरी क्रांती आणतं आहे असे केवळ परिसंवादांतून महान झालेल्या कवींचे म्हणणे आहे. ते खरे नाही.
अगदी मान्य. पण या मूठभर 'परिसंवादांतून महान झालेल्या ' कवीच्या म्हणण्यास विरोध म्हणून समस्त प्रयोगशील कविता ही दर्जाहीन आहे असा निष्कर्ष काढणे दुर्दैवाचे ठरेल. शिवाय आज आपण ज्याला नावाजतो असे कोणतेही काव्य त्याच्या उत्पत्तीच्या काळात प्रयोगशीलच होते हे विसरून कसे चालेल?
उदा. ज्ञानेश्वरी - संस्कृतातील भग्वदगीतेसारखा ग्रंथ मराठीत आणणे हा एक मोठाच प्रयोग होता इथेपासून ते मर्ढेकरांच्या कविता , सुरेश भटांच्या गझला हेही त्या-त्या काळात प्रायोगिक काव्यच होते असे म्हटले तर वावगे ठरू नये. या कवींना ज्या साहित्यिक आणि मानसिक हाल-अपेष्टा सोसाव्या लागल्या त्याच आपण नव्या प्रयोगशील कवींना देणार काय? म्हणून प्रयोगशील काव्याचे स्वागत झाले पाहिजे. त्यातुनच उद्याचे केशवसुत, मर्ढेकर, भट उदयाला येतील.
अर्थात ही आमची कविता त्या महान कवींच्या काव्याच्या पासंगालाही पुरणार नाही आणि त्यांच्या प्रतिभेचा एक कणही आम्हापाशी नाही ही हे आम्ही कबूल करतो. प्रयोगशील काव्याचे समर्थन करण्याचा हा एक प्रयोग आहे. आम्ही कोणी प्रयोगशील कवी आहोत असाही आमचा दावा नाही.
- दस नंबरी
ता.क.
"दुब्बी राजा आणि पुढे" असा काव्यसंग्रह काढण्याच्या विचाराने आमच्या मनात चांगला भलामोठा, संगमरवरी महाल बांधण्यासाठी प्लॉट शोधणे सुरू केले होते. पण आमच्याच उपरोक्त काव्याशी प्रतारणा नको म्हणून आम्ही आमच्या मनातील सारी जागा आरक्षित केली आहे याची कृपया नोंद घ्यावी.