नंदन,
लेख मस्त झालाय. आपल्या चाकोरीला सोडून आणि विचारांना चालना देणारे साहित्य मुद्दाम वाचण्याच्या तुझ्या उपक्रमाचे कौतुक करावेसे वाटते.
तू सांगितलेला अनुभव खरंच कल्पनेला छेद देऊन जाणारा आहे. तो वाचताना अंगावर सरसरून काटा आला. हे लिखाण वाचल्यावर तुझ्या मनात निर्माण झालेले प्रश्न तू खूप नेमकेपणाने इथे मांडले आहेस.
तुझ्या या प्रश्नांशी मी काही प्रमाणात सहमत आहे. अशा प्रकारचं खिळवून ठेवणारं. सशक्त, वेगळे विचार असणारं, बुद्धिमत्तेची चमक दाखवून जाणारं लेखन वाचल्यावर आणि जर ते मराठी भाषेतलं नसेल तर असा विचार मनात आल्यावाचून रहात नाही की हे असं काही मराठीत का लिहिलं जात नाही? किंवा असं दर्जेदार, उत्कृष्ठ आणि खणखणीत साहित्य मराठीत कधी निर्माण होणार? असा प्रश्न पडावा यात वावगं काही नाही.
असाच काहीसा अनुभव मॅक्झिम गॉर्कीची 'आई' ही कादंबरी वाचताना आला होता. पॉवेल या आपल्या मुलाच्या चळवळीच्या दिवसांची, संघर्षाची साक्षीदार इथपासून ते त्या लढाईत प्रत्यक्ष सैनिकाचं काम स्वीकारणारी एक कॉम्रेड इथपर्यंत आईचा झालेला प्रवास असाच मनावर ठसा उमटवून गेला होता.
किंवा जी एंचं माणसे अरभाट आणि चिल्लर वाचताना त्यातलं ते देवाने पापपुण्याचा हिशोब करताना दिलेलं दशांश चिन्ह, तो पायथागोरसचा तास, शाळा सोडताना, दातार मास्तरांना मागे सोडताना जाणीवपूर्वक मागे सोडलेला तो बालसुलभ आशावाद, ते वर्गाशेजारचं चर्च, तिथला तो स्टीफन माळी आणि ते वाचताना मनावर आलेलं एक उदास तरीही गूढ सावट मेंदूला अशाच झिणझिण्या देऊन गेलं होतं.
पण मला असं वाटतं की प्रत्येक भाषेचा एक स्वतःचा चेहरा असतो आणि तिचा जो नैसर्गिक प्रवाह आहे त्यात तिथल्या संस्कृतीचे अंकुर रुजून आल्यावर तो तयार झालेला असतो. त्यामुळे जागतिक दर्जाच्या तथाकथित पुरस्कारप्राप्त साहित्याशी आपल्या साहित्याची तुलना करणं कितपत योग्य आहे हे मला ठरवता येणार नाही.
मराठी गद्यसाहित्याची झेप ही साधारण दोनशे वर्षांच्या आतबाहेरची असावी.(बखर वांग्मय हे साहित्य मानता येईल का ? बहुधा नाही. चू भू दे घे) .मुळात मराठी भाषेचं वय साधारणपणे आठशे वर्षांच्या घरात असावं. तिला आजचं नागरी स्वरूप गेल्या साठसत्तर वर्षात आलं(मंग्लिश भाषा. विशेशतः जी उपग्रह वाहिन्यांवरील धारावाहिक शृंखलां(!)मधे ऐकायला मिळते ती). मराठी भाषेत कथा कादंबऱ्या लिहायला सुरुवात झाली त्याला दीडशे वर्षे झाली असावीत(पुन्हा एकदा चू भू दे घे). शिवाय मराठी माणूस हा त्याच्या कूपमंडूक वृत्तीसाठी, कुठल्याही बाबतीत धोके न पत्करण्यासाठी आणि एकूणातच परिस्थितीशी दोन हात करण्याऐवजी स्वतःमधे बदल घडवून तिच्याशी जुळवून घेण्याबद्दल प्रसिद्ध आहे. उदाहरणादाखल आपण आपली धरून मागच्या चार पिढ्या जरी विचारात घेतल्या तरी आपल्या अनुभवविश्वात असा किती बदल झाला आहे आणि तो साहित्यात प्रतिबिंबित करण्याची किती लोकांना हौस आहे हे लक्षात घ्यायला हवे. आजचे सगळे आयटी साहित्यिक(माझ्यासकट! अर्थात मी साहित्यिक म्हणजे गांडुळाला शेष म्हणण्यासारखं आहे... असो) हे टुकार कविता पाडणे नाहीतर उगाचच मिल्स ऍंड बून छापाच्या प्रेमकथा लिहिणे(हेही दुर्मिळच) यापलिकडे काही करत नाहीत. 'संगणकतज्ञ' असं मुद्दाम म्हणायचं कारण म्हणजे अनेक संगणकतज्ञच सध्या हौसेने काहीतरी लिहीत असतात. निदान त्या प्रयत्नात तरी असतात. इतर माणसं असला उद्योग करताना माझ्या तरी पाहण्यात फारशी आलेली नाहीत. शिवाय माझ्या आजूबाजूला चोवीस तास फक्त संगणकतज्ञच असतात हे मुख्य कारण असेल कदाचित.
त्यामुळे मला तरी वाटतं की आपल्या साहित्यात आपल्या या चतकोर अनुभवविश्वाचंच प्रतिबिंब पडणार आहे. आणि जागतिकीकरणाबद्दल म्हणशील तर त्याचे पडसाद साहित्यातून उमटण्यासाठी अजून थोडा वेळ लागेल.
निराशेचा सूर लावल्याबद्दल क्षमा कर. आशेला निश्चित जागा आहे. बारोमास सारखी पुस्तकं हे त्याचं उदाहरण ठरावं. पण जोवर पती-पत्नी और वो असल्या किंवा एकदम हळदी कुंकवाची दुकानं असल्या ठराविक चकव्यातून आपल्या मनोरंजनाच्या कल्पना बाहेर येत नाहीत तोवर बारोमास हाही एक सुखद धक्काच आहे.
सांगण्याचा हेतू फक्त एवढाच आहे की दोन भाषांमधील साहित्याची तुलना कोणत्या निकषांवर करायची हे ठरवायला पाहिजे. आणि आपल्या भाषेत खरं कसदार आणि अस्सल आपल्या मातीचं नातं सांगणारं लेखन पुढे यायला अजून थोडा वेळ लागणार आहे असे वाटते(अर्थात तोवर मराठी भाषा प्रचारात - वापरात असेल तरच)
--अदिती