चांगले साहित्य निर्माण करण्यासाठी खऱ्या अर्थाने होरपळून निघालेले जीवन प्रत्यक्ष जगण्याची, किंवा जवळून बघण्याची आवश्यकता आहे का? माझ्या मते, बहुतांशी होय. रशियन, ब्रिटिश अथवा इतर युरोपियन लेखकांनी हे असे अनुभवले, व ते त्यांच्या उत्तमोत्तम साहित्यात व इतर कलाकृतीत सहजपणे प्रतिबिंबित झाले. तीव्र वेदना अनुभवली पाहिजे, अथवा अगदी जवळून पाहिली पाहिजे, ही चांगल्या साहित्याच्या निर्मितीची pre requisite (माफ करा, ह्याला मराठीत काय म्हणता येईल?) आहे, असे मला वाटते. ह्याला काही अपवाद जरूर आहेत पण ते अपवादच राहतील, नियम नव्हे.
मराठी, किंबहुना भारतीय विश्वात प्रचंड उलथापालथ, हलकल्लोळ उडवणारे असे फाळणी सोडून काय घडले? नंदनच्या स्थळावर कुणीतरी शिवाजी महाराजांच्या लढाया व पानिपताची उदाहरणे दिली आहेत. त्या लढाया होत्या हे खरे, पण जे क्रौर्य, जी अमानुषता युरोपियन अथवा जपानी, चिनी लोकांनी भोगली आहे (आणि इतरांना दिली आहे), त्याच्यापुढे ह्या लढाया सौम्य ठराव्यात, त्यांनी समाजाला भिरकटवून टाकले नाही. फाळणीमध्ये तसे झाले पण त्याचा काहीही परिणाम मराठी विश्वावर जवळून झाला नाही. ह्या सर्वामुळे मराठी साहित्य दीर्घकाळ ज्या मध्यमवर्गीय मंडळीच्या हातात होते, तोंवर त्याचा आवाका अत्यंत मर्यादितच राहिला. ह्यातही धाकट्या माडगूळकरांसारखे, जी. ए., र. वा. दिघे व तेंडुलकरांसारखे काही अपवाद होते, पण त्यांनी त्यांच्या आयुष्यात जे भोगले, त्यांची प्रतिबिंबे त्यांच्या साहित्यात पडली आहेत. पेंडसे हेच म्हणता आहेत, त्यात चूक काय आहे? आपण आत्मनिरीक्षण करणार आहोत की नाही? व तसे करायचे असले, तर अर्थातच जगातील इतर साहित्याशी तुलना होणारच, ती करण्यात काय बिघडले? का आपल्याच तळ्यात आपणच राजे म्हणून राहणार आपण? आता जेव्हा बहुजन समाजातून सातत्याने लिखाण होत आहे, तेव्हा काही हाती लागते का बघूया.
वर बहुतेक प्रतिसादांत पुरस्कारांनी गौरविले की ते साहित्य दर्जेदार ठरले असे मानण्यावर आक्षेप घेतला आहे, तो मलाही मान्य आहे. पुरस्कार वगैरे राहू देत बाजूला, आपणच आपल्याला जोखूया, हे महत्त्वाचे.