हे मराठी वर्तमानपत्रातले इंग्रजी शब्द कधीकधी नीट लिहिलेही जात नाहीत, ह्याबद्दल मला सर्वात जास्त आक्षेप आहे. उदा. "ख्रिश्चन" "कांपुटर", "कैरियर" आणि असे लाखो शब्द- जे मराठीत लिहितांना त्या मूळ इंग्रजी शब्दांची सुद्धा तोडफोड केली जाते. बरेच मराठी वाचक जेंव्हा मूळ इंग्रजी शब्दांच्या उच्चाराबद्दल अनभिज्ञ असतात, तेंव्हा त्या marathi-cized उच्चारांनाच आत्मसात करतात, आणि दोन्ही भाषांपेक्षा वेगळीच कुठली धेडगुजरी भाषा बोलतात.

परवाच माझ्या आईशी मी हा वाद घातला होता. "Sauna bath" ला मराठीत सरळ "सोना बाथ" असा उच्चार आता रूढ झाला आहे तो माझ्या कानांना खटकतो. आईचं म्हणणं असं, की जर सगळ्याच मराठी वृत्तपत्रात, आणि मासिकांत असंच लिहितात, तर मी तोच उच्चार बरोबर धरून चालणार. "

झी टी-व्ही" म्हणतांना, झबल्यातला झ न म्हणता "झुमरू" त ला "झ" म्हणायचा, हे बरोबर आहे का? 

इंग्रजांनी आपल्या "जगन्नाथ" चे "Juggernaut" किंवा मुंबई- Bombay, Calcutta, असे अपभ्रंश केले, तसे आपणही आता इंग्रजी शब्दांचे विकृत स्वरूप मराठीत लिहायचे, तर त्यांच्यात आणि आपल्यात फरकच कुठे उरला? मला वाटते, की जेंव्हा परकीय भाषा शिकतो, किंवा तीचे शब्द मातृभाषेत सामावून घेण्याचा प्रयत्न करतो, तेंव्हा त्यांचे मूळ स्वरूप शक्यतोवर शुद्ध ठेवावे.