मला असा काहिसा प्रतिसाद अपेक्षित होताच. सर्वच नाटकांच्या सुरुवातीला मोबाईल वगैरे बंद/म्यूट करून ठेवण्याची विनंती करतात आणि लोकही अपेक्षित प्रतिसाद देतातच. पण अगदीच कुणाचा अनावधानानं राहिला सुरू; तर तो/ती सुद्धा तितक्याच तत्परतेनं मोबाईल बंद करतात. झाली चूक एकाची तर त्याची सगळ्या प्रेक्षकांना का शिक्षा? मोबाईल वाजल्यामुळं कदाचित जेवढा व्हायचा नाही तेवढा रसभंग विक्रम गोखलेंच्या असल्या तद्दन आणि फ़ालतू कृतीनं दोन तीन ठिकाणी झाल्याचं मी पाहिलंय. यातून शिस्त वगैरे लागण्यापेक्षा गोखलेंच्या बाबत आदर कमी झालाय. प्रेक्षकांचाच नव्हे बऱ्याच कलाकारांचा सुद्धा. दुसऱ्या एका विनोदी नाटकाच्या सुरुवातीला असलेल्या निवेदनात असं ऐकलं - "प्रेक्षकांनी कृपया आपली मुलं आणि मोबाईल सायलेंट मोडवर ठेवावेत. जरी चुकुन मोबाईल वाजलाच तर नाटक...थांबवून प्रेक्षकांचा रसभंग केला जाणार नाही".

एकीकडं प्रेक्षकांना मायबाप म्हणायचं आणि दुसरीकडं असा उर्मटपणा दाखवायचा हे विक्रम गोखलेंसारख्या ज्येष्ठ कलाकाराला किती शोभतं?