आपल्या प्रतिक्रियांबद्दल आभारी आहे. प्रतिक्रिया विस्कळीत नाहीत. तसे वाटलेच, तर तो अनुवाद आणि दोन-तीन चर्चांचे मुद्दे एकाच लेखात घुसडल्यामुळे झाले असेल. या प्रतिक्रियेत ते जरा अधिक स्पष्टपणे मांडायचा प्रयत्न करतो --

१. "चांगले साहित्य निर्माण करण्यासाठी खऱ्या अर्थाने होरपळून निघालेले जीवन प्रत्यक्ष जगण्याची, किंवा जवळून बघण्याची आवश्यकता आहे का? माझ्या मते, बहुतांशी होय." -- प्रदीप यांच्या या वाक्याशी सहमत आहे. प्रतिक्रियांत दिलेले मोजके अपवाद वगळले, तर याची सत्यत पटावी. अर्थात, चित्त यांनी म्हटल्याप्रमाणे या विधानाचा व्यत्यास खरा असण्याची काही आवश्यकता नाही.

२. एकंदरीत मराठी माणसांचे अनुभवविश्व आणि इंग्रजी/युरोपीय भाषकांचे विश्व यात बराच फरक आहे. यामुळेच त्या भाषांत जितके विविधांगी लेखन होते, तेवढे मराठीत होत नाही. -- याचा अर्थ, मराठी साहित्य/साहित्यिक/समाजजीवन सरसकट खुजे आहे असा नाही. पेंडशांचे मत याबाबत थोडे मवाळ करून स्वीकारावे लागेल. क्लासिक्स अर्थात अभिजात साहित्याचा मुद्दा जरी बाजूला ठेवला, तरी फ्रीकॉनॉमिक्स सारखी अर्थशास्त्रावरची, 'गन्स, जर्म्स अँड स्टील' सारखी मानववंशशास्त्रावरची पुस्तके मराठीत का येत नाहीत, याचे कारणच मुळात हे असावे.

३. अर्थात, यात कमीपणा मानण्याची काही गरज नाही. पारतंत्र्य, शिक्षणाचा - वैज्ञानिक प्रगतीचा अजूनही सर्वदूर न झालेला प्रसार या आणि इतर अशाच कारणांमुळे आपणच काय, पण एकूणच तिसरं जग शर्यतीत कधीच नव्हतं. -- हे लिहिण्यमागे पराभूत मनोवृत्ती नाही. शिवाय हे केवळ साहित्याच्या बाबत खरं आहे, असं नाही. जेव्हा आपण हॉलिवूड चित्रपटांतील वैविध्याशी, हाताळणीशी तुलना करून हिंदी चित्रपटांना सरधोपट, एकाच थीमवर बेतलेले असं हिणवतो; तेव्हा हेही लक्षात घ्यायला हवं की दोन्ही समाजांच्या अभिरुचीतला फरक (एक चांगली, दुसरी टाकाऊ असे यातून ध्वनित करायचे नाही.) हे यामागचे कारण आहे, आणि त्यामागे समाज खऱ्या अर्थाने स्वतंत्र कधी झाला, चंद्राकडे पाहून भाकरी आठवण्याऐवजी कविता केव्हापासून सुचायला लागली हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. (पुन्हा नारायण सुर्वे, दया पवार, लक्ष्मण माने... हे सन्माननीय अपवाद झाले.) सांगायचा मुद्दा हाच, की जसं आपलं साहित्य सर्वश्रेष्ठ हा गंड जसा चुकीचा आहे, तसाच येता-जाता मराठीत कसदार निर्मिती का होत नाही म्हणून झोडपणं हेही बरोबर नव्हे.

४. जागतिकीकरणाने काही फरक पडेल का? -- हा वेगळ्याच चर्चेचा मुद्दा आहे. तो येथे असा ओझरता मांडल्याबद्दल क्षमस्व. जागतिकीकरणातून (कधी ना कधी) सारे समाज जरी एकाच पातळीवर येतील असं म्हणणं धाडसाचं असलं; तरी परस्परावलंबित्व वाढल्याने एका कोपऱ्यात घडलेल्या घटनेचा साऱ्या जगावर परिणाम होईल. दुसरं असं की, आपल्या देशात एक फार मोठा वर्ग आता नव्यानेच शिक्षित होतो आहे, होईल. त्यांचं म्हणणं, त्यांचे अनुभव प्रादेशिक भाषांत येतील. त्यांची वाचनाची मागणीही नवीन लेखनाला चालना देईल.

दुसरीकडे जो आता सुस्थितीत असलेला वर्ग आहे, त्याच्याही कक्षा रुंदावत आहेत. 'सदाशिव पेठ ते सॅन होजे' हे फारच ढोबळ उदाहरण झालं. पण मानववंशशास्त्रज्ञ, अर्थतज्ञ, इलेक्ट्रॉनिक माध्यमांतील पत्रकार, डीजेज, वैमानिक, उद्योजक इ. ज्या न रुळलेल्या वाटा आहेत, त्यांची दारे प्रथम त्यांना किलकिली होतील (किंवा मूळच्या सुस्थितीमुळे, या संधींचा सर्वाधिक फायदा ते घेऊ शकतील.) दुर्दैवाने, अशा अभिजनांपैकी बहुतेकांना इंग्रजी अधिक जवळची वाटेल/वाटते. (दिलीप सरदेसाईंची कन्या सोनाली सरदेसाई ही युनोमध्ये 'कॉंफ्लिक्ट प्रिव्हेन्शन' तज्ञ म्हणून काम करते, असे नुकतेच वाचले. गूगलल्यावर तिच्या नावावर काही इंग्रजी पुस्तके सापडली. मराठीत - अनुवाद म्हणून नाही, पण मूळ पुस्तक छापले जाण्याची शक्यता किती?) पण यातला थोडा भाग जरी मराठीत आला, तरी लगेच जागतिक दर्जाचे साहित्य निर्माण होईल असे नाही, पण वैविध्य आणि गुणात्मक भर यादृष्टीने नक्कीच फरक पडेल.

शेवटी महत्त्वाचे :

मराठी साहित्याच्या दर्जाविषयी ठणकून मत द्यावे, एवढा माझा अधिकार नाही याची नम्र कल्पना आहे. चौकस यांच्या प्रतिसादातली पुस्तकांची नावे वाचून, अजून किती वाचायचं बाकी आहे याची जाणीव झाली. (हे सरळ अर्थाने म्हटले आहे, शालजोडीतले वगैरे नाही.) त्यामुळे वरील लेखाचा उद्देश मराठी साहित्य किती क्षुद्र, संकुचित आहे हे सांगण्याचा नक्कीच नाही. इंग्रजीशी तुलना केली तर ते तोकडे पडते (अपवादांनी अर्थातच नियम सिद्ध होतो), आणि वरील मुद्धा क्र. १ आणि २ मान्य केल्यास, तसे होणे काही प्रमाणात स्वाभाविक का आहे आणि त्यामुळे तुलना केवळ आत्मनिरीक्षणासाठी आणि शक्य झाल्यास सुधारणेपुरती मर्यादित ठेवावी; उगाच मराठीत शेक्सपिअर का नाही म्हणून गळे काढू नयेत असे मला वाटते. भविष्यात यात काही फरक पडेल का? अर्थात, जागतिकीकरण होतंय म्हणून अचानक तिसऱ्या जगात साहित्यक्रांती घडून येणार नाही हे खरं. पण प्रादेशिक लेखनव्यवहार अधिक लोकांपर्यंत पोचेल, लेखनात संख्यात्मक आणि कदाचित गुणात्मक वाढ होईल अशी आशा वाटते.