लेख/चर्चेची सुरवात फारच छान वाटली आणि आवडली. वारकरी संप्रदाय हा एक भक्तिमार्ग म्हणून ज्ञानेश्वरांनी चालू केला होता. तो अशा वेळेस चालू केला (१३ व्या शतकाच्या शेवटाला) जेव्हा महाराष्ट्र हा सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या रसातळाला जात होता. समाजात सर्व प्रकारची तामसिकता वाढीस लागली होती. इथून वरती येण्यास लागणारा प्रयत्न  हा काही एका क्रांती करून संपण्यासारखा नव्हता तर तो उत्क्रांतीने हळू हळू तामसिकता कमी करत समाजाला जागृत करण्याचा होता. परिणामी पुढच्या  तीनशे वर्षात ज्याला बाबासाहेब पुरंदरे "काळरात्र" संबोधितात, समाजाची पणती, मिणमिणतं का होईना तेवत ठेवायला त्याचा उपयोग झाला. या संत मंडळीच्या शतोकोत्तर प्रयत्नांमुळे परत समाज जागृत हळू हळू होत गेला आणि त्यातूनच शिवराज्य आणण्यासाठी तत्कालीन समाजाची तयारी झाली. ह्या संतमंडळींनी घातलेल्या सामाजिक समतेच्या पायामुळेच पुढे आगरकर, फुले, आंबेडकर, कर्वे, इत्यादी १८-१९व्या शतकातील समाजसुधारक हे (बंगालचा अपवाद सोडल्यास) तत्कालीन भारतात इतर कुठे न होता महाराष्ट्रात होऊ शकले.

या सर्व संतांचे अजून एक वैशिष्ठ्य म्हणजे त्यांनी स्वतःचे व्यक्तिगत वारस तयार केले नाहीत. बऱ्याचदा इतिहास सांगतो की जिथे जिथे असे वारस तयार झाले तिथे तिथे ते मूळ विचार भ्रष्ट होत गेले.

तुकारामांनी या वारीचे सार्थ वर्णन त्यांच्या "खेळ मांडीयेला" अभंगात छान केले आहे: (शब्द जसे आठवतात तसे, चू.भू.द्या.घ्या.)

वर्ण अभिमान, विसरलीयाती, एकमेका लोटांगणे जाती, निर्मळ चित्ते झाले नवनिते पाषाण पाझर फुटती रे ।।खेळ मांडीयेला..॥

...

होतो जयजयकार गर्जत अंबर,  ... , तुका म्हणे सोपी केली पायवाट, उतरावया भवसागर रे ॥खेळ मांडीयेला..॥