क्षमा असावी पण मला हा गुणवत्ता देण्याचा मार्ग पटत नाही. amazon.com वर पुस्तकांच्या समीक्षा दिलेल्या असतात (कुणीही लिहू शकतात). त्या समिक्षेत दिलेल्या गुणानुसार पुस्तकांची वर्णी लागते. तिथे अगदी प्रसिद्ध लेखकसुद्धा स्वत:च्या पुस्तकाला टोपणनावाने समीक्षा लिहून जास्त गुण देतात, अशी बातमी होती. एकमेकांची पाठ खाजवण्याचे प्रकारसुद्धा होतात. दुसरे असे की फक्त गुणवत्ता यादीतील गुणवंतांचे कौतुक होणार असेल तर सामान्य 'विद्यार्थी' ह्या शाळेतून बाहेर पडतील आणि मग केवळ गुणवंत एकमेकांचे गुण गात राहतील, अशी भिती वाटते. आतासुद्धा निरोपांना मिळणार्या प्रतिसादांची संख्या बघून गुणवत्तेचा अंदाज बांधता येतोच.
लेख-कविता-निरोप नेमके सापडावेत म्हणून काही बदल करण्याची गरज आहे. मायबोली ह्या संकेतस्थळावर प्रचलित असलेल्या विभाग-पद्धतीपेक्षा मनोगतावरील पद्धत बरीच चांगली आहे. तरी मनोगतावर कालानुरूप सोयी कराव्या लागतील हे मात्र मान्य.
मला वाटतं मनोगतावर विषयांचे जास्त स्पष्ट विभाजन करण्याची गरज आहे. "प्रकटन, प्रतिसाद, प्रतिभा, संस्कृती" हे विभाजन संभ्रम निर्माण करणारे आहे, असे मला वाटते. तसेच "लेखनप्रकार आणि लेखनविषय" असे पुन्हा विभाजन करण्याची गरज लक्षात येत नाही. त्यातही अनेक लेखनप्रकार आणि लेखनविषय निवडता येण्याची लेखकांसाठी असलेली 'सोय' ही वस्तुत: वाचकांची गैरसोय करते. मनोगतावर आल्यानंतर प्रथम दिसणार्या ह्या शीर्षकांवर क्लिक करणे मला तरी गैरसोयीचे वाटते. त्यापेक्षा "ताजे लेखन" बघितल्यास सर्वच नवीन लिखाण बघता येते.
परंतू जसजसे सभासद वाढतील तसतसे "ताजे लिखाण" वाढत जाणार आणि मग हवे ते शोधण्यात जास्त अडचणी येतील. त्यामुळे माझ्या मते लेखन प्रकार आणि लेखन विषय ह्यांचे एकत्रीकरण करून खालीलप्रमाणे विभाग आणि पोटविभाग बनवावेत-
१. स्व-निर्मित साहित्य
- कथा
- कविता
- ललित लेख
२. प्रसिद्ध लेखक कवींच्या साहित्यावर चर्चा
- कथा
- कविता
- ललित लेख
- कादंबरी
- नाटक
३. संगीत
- शास्त्रीय, उपशास्त्रीय, भावगीत, नाट्यगीत इत्यादि.
४. अर्थकारण
५. राजकारण
६. संस्कृती
७. तंत्रज्ञान
८. शिक्षण
९. विरंगुळा
- चुटके, कोडी, वगैरे
१०. पर्यटन
११. पाककृति
१२. सर्व विभागांतील ताजे लेखन (हे मात्र बंद करू नये)
ह्यामध्ये सुधारणा किंवा भर घातली जाऊ शकते. पण केलेले लिखाण हे एकाच विभागात (किंवा पोटविभागात) प्रकाशित व्हावे. त्यामुळे हवा तो विभाग उघडून बघितला की निरोपांच्या गर्दीत हरविल्यासारखे होणार नाही. सोबतच प्रत्येक विभागासाठी स्पष्ट सूचना असाव्यात.
दुसरे असे की मनोगत हे मराठी माणसांच्या आवडीचे ठिकाण व्हावे म्हणून काही बंधने सर्वांनी पाळायला हवीत. नको तितक्या टोकदार भाषेत टीका करणे वगैरे आपण सामाजिक संमेलनात पाळतो तसे. मला वाटतं टोपण नावांमुळे फार काही साधले जात नाही. उलट आपला खरा नाव पत्ता दिला असल्यास आपोआपच वागण्यावर सभ्यतेचे निर्बंध येतात. खरे नाव पत्ता वापरण्यास प्रोत्साहन देण्यात यावे.
मी स्वत: ryze.com ह्या सोशल नेटवर्किंग वेबसाईटचा सदस्य आहे. तिथे अनेक विषयांना वाहिलेले शेकडो forum (board) आहेत. प्रत्येक फोरम मध्ये जगभरातील शेकडो हजारो सदस्य असतात. पैसे देऊन सभासद होणार्या सदस्यांनाच फक्त फोरम सुरू करता येतो पण कुणीही त्या फोरमचा सभासद होऊ शकतो. अर्थात त्यासाठी आधी ryze.com चे सभासद होणे आवश्यक आहे आणि त्यासाठी पैशांची गरज नाही. मनोगतावर तसे काही करता येईल काय (किंवा त्याची गरज आहे काय) ह्याविषयी मात्र मी साशंक आहे.
पण एक करता येईल. ryze वर असलेली सभासदाच्या वैयक्तिक पानाची (page) सुविधा इथे सुरू करता येईल. इथे मनोगतावर आहे ती अगदीच प्राथमिक स्वरुपाची आहे. त्याऐवजी सभासदाच्या फोटोसहित HTML चा वापर करण्याची सुविधा मिळाली तर बरे होईल. [ http://www.ryze.com/go/praj59 हे माझे तिथले पान आहे.] ज्यांना HTMLजमत नाही त्यांच्यासाठी template देता येतील.
दुसरे असे की व्यवसाय, शहर, शिक्षण इत्यादि नुसार सदस्यांचा शोध घेता आला तर सदस्यांना एकमेकांची मदत घेता येईल.
प्रशासकांना विनंती आहे की त्यांनी ह्या चर्चेत भाग घेऊन त्यांचे मत आणि संभाव्य अडचणी बद्दल आम्हाला अवगत करावे.
आपला
-राजेन्द्र
(वर लिहिलेल्या मजकुरात मराठीऐवजी काही इंग्रजी शब्द आले आहेत पण त्याकडे दुर्लक्ष करून मूळ मुद्द्यावर प्रतिसाद द्यावा ही नम्र विनंती.)