"जमलं कां... हा मजेशीर लेख वाचून अशाच एका वल्लीची आठवण झाली. मी सरकारी नौकरीत असतांना अंशकालीन बदली घेऊन आलेले एक वरिष्ठ आम्हाला कांही काळ लाभले होते. या गृहस्थांचे वैशिष्ठ्य म्हणजे हा माणूस सरळ असला तरी, त्यांना कोणतेही वाक्य सरळ बोलताच येत नसे. नेहमी वाकड्यातच बोलणार.
मी प्रथमच, त्याने दिलेले काम पूर्ण करून त्यांना दाखवायला गेलो आणि ही फाईल कुठे ठेऊ असे विचारले तर म्हणाले, "जमलं का? ठेवा आमच्या बोडक्यावर. बघा जमतंय कां!" त्यावेळी मीही तडकलोच होतो. पण म्हणतात ना, साहेबाच्या पुढे आणि गाढवाच्या मागे चालू नये; दोघेही लाथ मारतात. पण त्या तीन वक्यांचा अनुक्रमे अर्थ, ' काम व्यवस्थित झालं का?, ही फाइल आता वरच्या कार्यालयाकडे पाठवा,प्लीज एवढे काम कराल कां?' असा होता हे कलांतराने आणि सहवासाने समजले.
एकदा कांही कामानिमित्त्य या साहेबांच्या घरी गेलो होत तर, माझं स्वागत " अरे वा! जमलं की तुम्हाला. या, या." अशा वाक्याने झालं. त्यांच्या स्व्ययंपाक घरात असलेल्या पत्नीला चहा करायला सांगतांनाही, " अहो, जरा चहाचं बघता का जमलं तर " असाच पुकारा होता. नंतर मला म्हणाले, " त्याचं काय आहे, त्या आता बाहेर निघाल्या आहेत, भिशीला. ते त्यांना बरं जमलं आहे. म्हणून म्हणालो थोडा वेळ असेल आणि जमलं तर चहाचं जमवा.
या साहेबांच्या या ' जमलं ' या शब्दाचा एकदा भलताच कहर झाला. आमच्यातला एक सहकारी लग्न आणि मधुचंद्रासाठी घेतलेली रजा संपवून परत रुजू झाला आणि मोठ्या हर्षोल्लासाने या साहेबमजकुरांना भेटायला गेला तर म्हणाले, " या. आज रुजू होताय कां? छान! छान. कसा झाला तुमचा मधुचंद्र? जमलं कां?"