>> २.या अभंगातील 'खोळ बुंथी घेऊनी खुणेची पालवी। आळविल्या नेदी सादु।।'या ओळीचा अर्थ काय आहे?
लहान मूल जसे डोक्यावर जाड रजई घेऊन "आ ऽऽ ई मी कु ऽऽ ठे?" असे म्हणून लपून बसतो तसे ईश्वर भक्ताला हाक मारून निर्गुणत्वात लपून बसतो. ( खोळ बुंथी घेऊनी ) बराच वेळ प्रयत्न करूनही आईला आपला छडा लावता आलेला नाही हे लक्षात आल्यावर ते बालक जसे मध्येच "आ ऽऽ ई मी ई ऽऽ थे" असे म्हणून हिंट देते तसे भगवंत भक्ताला ही हिंट देत आहेत. (खुणेची पालवी) "बेटा तू कुठे आहेस?" असे आई विचारते तेव्हा तो लबाड काहीच उत्तर देत नाही कारण मग खेळातली सगळी मजाच निघून जाईल ना! (आळविल्या नेदी सादु)
महाराष्ट्रातले बहुतेक सर्व संत द्वैत भक्तीवर विश्वास ठेवणारे होते. "मी भक्त, तू देव ऐसे करी" अशी मागणी करणे म्हणजे अद्वैतवाद्यांना कमीपणाचे वाटेल कदाचित. प्रियकर प्रेयसीच्या नात्यात असलेला गोडवा लग्नानंतर खतम होतो असे म्हणतात (मला त्या विषयातील फारशी माहिती नाही, ऐकीव माहितीवरून हे विधान करत आहे) तसे द्वैतातला गोडवा अद्वैतात खतम होईल ही भीती भक्ताला लागून राहिलेली असते.
थोडक्यात, भक्त व भगवंत यांच्यातील मधुर संबंधांचा ठाव घेणारे हे वाक्य आहे.
हा अभंग आनंदघन यांच्या याहू अनुदिनीवरही वाचता येईल.