माझे शिक्षण मराठी माध्यमातून झाले आहे. (आमच्या गावात इंग्रजी माध्यमाची शाळा नव्हतीच. मीही शिवाजी विद्यापीठाचाच पदवीधर) याचा माझ्या पुढील आयुष्यावर कोणताही अनुचित परिणाम झाला नाही. उलट मराठीमुळे मी अधिक समृद्ध झालो आहे असे मला वाटते. इंग्रजी भाषाही मी माझ्या आवडीमुळे शिकलो आणि तिनेही मला खूप आनंद दिला आहे. याउलट माझ्या मुलाचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले आहे आणि तो मराठी त्याच्या आवडीमुळे शिकला आहे. तो मराठी उत्तमप्रकारे वाचू आणि लिहू शकतो. त्यामुळे भाषेमध्ये असे 'मराठी वापरणारे' आणि 'इंग्रजी वापरणारे' असे तट पाडू नयेत असे मला वाटते. 'इंग्रजीचा दुस्वास करुन मराठीची वाढ होणार नाही' हेच परत लिहितो. तसेच मराठी माणसाने आपल्या मुलांना मराठीचा वाराही लागू द्यायचा नाही आणि घरातही त्यांना इंग्रजी बोलायला वगैरे लावायचे हे खुळचटपणाचे आणि केविलवाणे आहे, असे मला वाटते.