माझेही म्हणणे अगदी असेच आहे.

माझ्या मुलाने; तो इंग्रजी माध्यमात शिकत असूनही आणि इथे कोणतेही सहजी मराठी वाचन दुरापास्त असूनही; गोट्या, चिंगी, बंडखोर बंड्या पासून ते भा.रा. भागवतांचा मराठी रॉबिनहूड वाचून काढला आहे. शिवाय इंग्रजी हॅरी पॉटरही त्याचा तितकाच आवडता आहे.  माझ्या मुलीला इंग्रजी, मराठी, हिंदी आणि तेलुगू भाषा समजतात आणि बोलताही येतात. (ती अडीच वर्षांची आहे.) ती आतापासूनच (ऐकून ऐकून) उर्ध्वमूलम अध: शाखम, ट्विंकल ट्विंकल किंवा माझे माहेर पंढरी बोबड्या भाषेत म्हणते. 

माझ्या मुलांचे कौतुक सांगत नाही. त्यात विशेष काही नाही. फक्त उदाहरण सांगितले. माझ्या टांझानियातल्या मित्राच्या दोन्ही मुलांना तर स्वाहिली भाषा बोलता येते. कोणी फ्रान्स-जर्मनीमध्ये रहात असेल तर त्या मुलांना फ्रेंच-जर्मनही येत असेल.

मुलांना काय शिकायचे आहे ते शिकू दे. आपण फक्त क्याटालिस्ट.

येणारी पिढी आजच्या पिढीपेक्षा बुद्धीमान आहे. ती अनेकभाषी होते आहे. त्यामुळे शैक्षणिक माध्यम, मराठी भाषेची अस्मिता, मराठीची चाड इ. चर्चा आता कालबाह्य होत आहेत.
मराठी भाषेला मरण नाही. फक्त आपली मराठी आणि पुढे येणारी मराठी थोडी वेगळी असेल.
नाहीतरी आपण तरी कुठे , "श्री चामुंडराये करवीयले, गंगराये सुत्ताले करवीयले" किंवा " मशारनिल्हे, गुदस्तां, मेहरबानांस जाहीर व्हावे" अशी मराठी लिहितो, बोलतो?

फक्त एकच वाटते - मराठी माणसाने मराठी माणसाशी (कसल्याही) मराठीत बोलले तरी पुरे.